Virar Crime News Update : विरार येथे चालत्या कारमध्ये 21 वर्षीय महिलेचा झालेला विनयभंग आणि तिच्या 11 महिन्याच्या लहानग्या मुलीच्या हत्येप्रकरणी आता आश्चर्यकारक नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. सदरचा गुन्हा तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या टीमने यात त्यावेळी गाडीत बसलेल्या चौघांना शोधलं असून चौघांचे ही कोर्टासमोर जबाब नोंदवण्यात आलं आहे. तर यातील मुख्य आरोपी विजय कुशवाह आणि तक्रारदार महिलेची देखील गरज भासल्यास लाय डिटेक्टरद्वारे तपास करणार असल्याच सुत्रांकडून कळत आहे. 


श्रध्दा हत्याकांडानंतर विरारमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर मोठ्यानं होतं होती. शनिवारी, 10 डिसेंबर रोजी 11.30 च्या दरम्यान एका प्रवासी इको कारमध्ये 21 वर्षीय पीडित महिलेचा विनयभंग करण्यात आला. त्याबरोबर तिच्या 11 महिन्याच्या लहानगीला धावत्या कारमधून फेकून देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला होता. यात लहानगीचा मृत्यूही झाला होता. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी शनिवारी रात्री तक्रारदार महिलेच्या जबानीप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. 


या गुन्ह्याच्या तपासामध्ये आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या टीमने गाडीत बसलेल्या चार आरोपींना शोधलं आहे. तर यातील दोन प्रवासी हे गुजरातचे असल्यामुळे त्यांचा ही शोध सुरु आहे. या चारही सहप्रवासी असलेल्यांची जबानी वसई न्यायालयासमोर न्यायमूर्तींसमोर करण्यात आली आहे. या चौघांची जबानी बंद लिफाफ्यात आहे. गुन्हे शाखा चौघांची जबानी कोर्टाकडून मागवून घेणार आहे.  


या महिलेच्या म्हणण्याप्रमाणे मागील लोकांनी तिचे मुल फेकल्याचं म्हणत असेल तर मुलं आणि महिला एकाच ठिकाणी पडायला नाही पाहिजे. घटनेच्या वेळी मागून राष्ट्रीय महामार्ग पोलिसांची गाडी होती. त्यांना ही महिला आणि मुलं एकाच ठिकाणी दिसलं. त्यांनीच ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या मदतीने नजीकच्या रुग्णालयात लहानग्या मुलीला आणि महिलेला नेलं होतं.  महिलेने दिलेला जबाबाची सत्यता तपासाअंतीच समोर येईल. मात्र सध्या पोलीस चौहोबाजूनी तपास करत आहेत. आरोपी विजय कुशवाह याच्या सत्येतेबद्दल ही त्याची लाय डिटेक्टर चाचणी करण्याच्या तयारीत पोलीस असल्याच कळत आहे. तर महिलेचीही लाय डिटेक्टर चाचणी करण्याच्या शक्यतेकडेही पोलीस जात आहेत.  त्यामुळे भविष्यात याप्रकरणात नवीन काय समोर येतं याकडे लक्ष लागून आहे. 


नेमकं काय घडलं होतं...


पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती हा पेल्हार येथे काम करत आहे. आपल्या पतीला भेटण्यासाठी ही महिला पेल्हारला आली होती. त्यानंतर पती मस्तान नाका येथे गेल्याने, ती आपल्या मुलीसोबत मस्तान नाका, मनोर येथे जाण्यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग येथील पेल्हार फाटा येथून दुपारी 11.30च्या सुमारास मारुती कंपनीची इको या प्रवासी कार मध्ये बसली. कार सुरु झाल्यानंतर कारमधील इसमांनी तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मागील सीटवर बसलेल्या इसमांनी तिची 11 महिन्याच्या लहानगीला चालत्या कार मधून फेकून दिलं. त्यानंतर तिने आपल्या बाळासाठी स्वतः चालत्या कारमधून उडी मारली. त्यात ती जखमी झाल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं. घटनेच्या वेळी कारच्या मागे राष्ट्रीय महामार्ग पोलिसांची गाडी होती. महिला आणि मुल खाली पडल्यावर महिलेला आणि लहान मुलाला महामार्ग पोलिसांनी त्याच कारमध्ये बसवून तात्काळ वसई विरार शहर महानगर पालिकेच्या नालासोपारा पूर्वेकडील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यामुळेच तिच्या वर वेळेवर उपचार होवू शकले. तसेच कार चालक विजय कुशवाह आणि गुन्ह्यात वापरलेली कार मांडवी पोलिसांना तात्काळ ताब्यात घेतलं होती. या घटनेत दुर्दैवाने लहानगीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी घटनेच गांभीर्य ओळखून, या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता.