Mumbai Ahmedabad National Highway: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका धावत्या गाडीत महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. कारमधील नराधम आरोपीनं दहा महिन्याच्या मुलीला फेकून दिल्याची माहिती पीडितेनं दिली आहे. पोटच्या पोरीला गाडीबाहेर फेकल्यानंतर पीडितेनं कोणताही विचार न करता गाडीमधून उडी घेतली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार फाटा (Virar) येथे ही धक्कादायक घटना घडली. या प्रकारानंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलीसांनीही याप्रकरणी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी कार आणि कार चालकाला ताब्यात घेतलं आहे.


आज (10 डिसेंबर ) दुपारच्यावेळी पीडित महिला पतीला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी कारमधील नराधमाने विनयभंग केला. त्यावेळी दहा महिन्याच्या चिमुकलीला त्यानं गाडीबाहेर फेकलं. पोटच्या पोरीला वाचवण्यासाठी पीडित महिलेनेही धावत्या कारमधून उडी घेतली. यामध्ये महिला जखमी झाली असून तिच्यावर नालासोपार पूर्वेच्या वसई विरार (Vasai Virar) पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्देवी घटनेत दहा महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. 


जखमी महिला वाडा तालुक्यातील पिंपलास गावाची राहणारी आहे. तिचा पती नालासोपारातील (Nala sopara) पेल्हार येथील एका कंपनीत काम करत आहे. ती त्याला भेटण्यासाठी आज आली होती.  महिलेने पालघरच्या मस्तान नाका येथे जाण्यासाठी  GJ 15, PJ 1137 या इको कारचा आश्रय घेतला. नालासोपारा पेल्हार याठिकाणावून वाडा कडे जाण्यासाठी निघाली होती. पण विरार फाटा परिसरात या महिलेची गाडीतील इसमांनी छेड काढली आणि त्यानंतर तिच्या मुलीला फेकून दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यानंतर महिलेने स्वतः ही चालू गाडीतून उडी मारली आहे.


इको कार चालक विजय कुशवाह याला मांडवी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच कारही ताब्यात घेतली आहे. याबाबत मांडवी पोलिसांकडून कोणतीही माहिती दिली जात नव्हती. माञ महिलेन प्रसारमाध्यमांकडे बोलताना ही धक्कादायक माहिती दिली. श्रमजीवी संगठनेच्या महिला आघाडीने पोलीस पिडीत महिलेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 


ही बातमी वाचाच :


Kolhapur Latest News Marathi : घरात लेकीच्या लग्नाची धावपळ सुरु असतानाच बापाला निरोप देण्याची दुर्दैवी वेळ! मनाला चटका लावणारी निवृत्त प्राध्यापकाची 'एक्झिट'