Vasai Crime News: अनैतिक संबंधातून पत्नीने पतीची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना वसईत (Vasai ) उघड झाली आहे. पत्नीसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेणाऱ्या पती-पत्नीला वालीव पोलिसांनी आणि वसई गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने 48 तासात अटक करण्यात यश मिळवलं आहे. हत्येची सुपारी एक लाख रुपये आरोपी पत्नीने आपल्या शेजारी राहणाऱ्या पती पत्नीला दिली होती. शेजारी आरोपी हा तांत्रिक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 


Vasai Crime News: 48 तासात गुन्हा उघडं करुन चौघांना अटक


मिळालेल्या माहितीनुसार, नायगांव पूर्व रिक्षा स्टॅन्ड ब्रिज जवळच्या खाडीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह 27 जानेवारी रोजी पाण्यात आढळून आला होता. वालीव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुंबईला पाठवला असता. जे. जे. हॉस्पिटलच्या पोस्टमार्टम रिपोर्ट प्रमाणे या इसमाची हत्या झाल्याचे उघड झालं होतं. वालीव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन, तपास सुरु केला होता. मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलिसांसमोर मयताची ओळख पटवून गुन्हा उघड करणं हे मोठं कडवं आव्हान होतं. पोलीस तपासात मुंबईच्या बांगुर नगर पोलीस ठाण्यात एक मनुष्य मिसिंग असल्याच कळलं. मिसिंग व्यक्ती तोच असल्याच स्पष्ट झाल्यावर वसई गुन्हे शाखा कक्ष दोन आणि वालीव पोलिसांनी अवघ्या 48 तासात गुन्हा उघडं करुन, यात चौघांना अटक केली आहे. 


Vasai Crime News: तांत्रिकाला सुपारी देऊन काढला पतीचा काटा  


अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याच्या पोलीस (Police) तपासात उघड झाले आहे. मयत कमरुद्दीन मोहम्मद अन्सारी हा गोरेगांव (goregaon) येथे भगतसिंग नगर येथे चाळीत राहतो. आरोपी त्याची पत्नी आयशा खान हिचे हरिश खान सोबत प्रेमसंबध होते. आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी त्यांच्या शेजारी राहणारे आरोपी बिलाल उर्फ मुल्ला निजाम पठाण आणि त्याची पत्नी सौफिया बिलाल पठाण या दाम्पत्यांना एक लाखाची सुपारी दिली. आरोपी बिलाल उर्फ मुल्ला हा तांत्रिक ही असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दोघा पती पत्नीनी मयत कमरुद्दीनला नायगांवच्या खाडी किनारी नेवून, डोक्यावर प्रहार केला आणि त्यानंतर त्याचा तीक्ष्ण हत्यारान गळा चिरुन त्याची हत्या केल्याच स्पष्ट झालं आहे. चौघांनाही पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास आता वालीव पोलीस (waliv police station) करत आहे.