Pune crime Nilesh Chavan: निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये अश्लील क्लीपचं घबाड? पासवर्ड क्रॅक झाला तर पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळणार
Vaishnavi Hagavane Case: पोलीस कोठडी मागताना त्याच्या लॅपटॉप मधील महिलांची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती असल्याची शक्यता पुणे पोलिसांनी वर्तवली.

Pune Crime Nilesh Chavan: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील (Vaishnavi Hagavane) सहआरोपी निलेश चव्हाणला 14 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान वारजे पोलीस ठाण्यामध्ये कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल होता. सह आरोपी निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये महिलांची अश्लील चित्रे, चित्रफिती असल्याची दाट शक्यता असून लॅपटॉपचा पासवर्ड देण्यासाठी त्याने प्रचंड टाळाटाळ केल्याचे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. निलेश चव्हाण च्या दहशतीला घाबरून अनेक पीडित महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या नाहीत. निलेश चव्हाण चा लॅपटॉप सुरू झाल्यास त्याच्या विरोधात आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं.
वैष्णवी हगवण्याचे नऊ महिन्यांचे बाळ काही दिवस निलेश चव्हाणकडे होते. या काळात बाळाचे हाल करत वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकवल्याप्रकरणी निलेश चव्हाण वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला बुधवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी त्याला पोलीस कोठडी मागताना त्याच्या लॅपटॉप मधील महिलांची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती असल्याची शक्यता पुणे पोलिसांनी वर्तवली.
पासवर्ड देण्यासाठी टाळाटाळ, उडवाउडवीची उत्तरे
निलेश चव्हाण चा लॅपटॉप जप्त करण्यात आला होता. हा लॅपटॉप सुरू करण्यासाठी पासवर्ड ची विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली व उडवा उडवीची उत्तरे दिली. या लॅपटॉप मध्ये महिलांच्या अश्लील चित्रफिती असण्याची दाट शक्यता असून निलेश चव्हाणच्या दहशतीला घाबरून महिला त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नसाव्यात अशी शक्यता आहे. पुणे पोलिसांनी त्याच्याकडून पासवर्ड मिळवून लॅपटॉप सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले असून हा पासवर्ड जर मिळाला तर पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावे या लॅपटॉप मधून मिळण्याची शक्यता आहे असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. निलेश चव्हाण याच्यावर वारजे पोलीस ठाण्यात बलात्कार अनैसर्गिक अत्याचार चोरी आत्महत्येस प्रवृत्त करणे हुंडाबळी पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणे अशी गंभीर कलमे दाखल झाली आहेत.
निलेशच्या घरात पोलिसांना काय सापडलं?
निलेशच्या घरातून पोलिसांनी 3 मोबाईल फोन, शस्त्र परवाना, पिस्तूल आणि पासपोर्ट या वस्तू जप्त केल्या. पोलिसांकडून निलेशची कसून चौकशी केली जाते आहे. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांचे मोबाईल निलेशच्या घरी आढळून आले. निलेश चव्हाणकडून याआधी 3 मोबाईल जप्त केले. शनिवारी आणखी 3 फोन जप्त केले. जप्त मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती बावधनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.
हेही वाचा
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! निलेश चव्हाणसह शशांक हगवणेला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी
























