Ulhasnagar Firing Latest Update : उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हिल लाईन पोलीस (Hill Line Police Station) गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या मुलाचा शोध सुरु आहे. उल्हासनगर गोळीबार (Ulhasnagar Firing) प्रकरणामध्ये आरोपी असलेले भाजप आमदार (BJP MLA) गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांचे सुपुत्र वैभव गायकवाड (Vaibhav Gaikwad) आणि नागेश बडेकर (Nagesh Badekar) या आरोपीचा अजूनही पोलीस तपास घेत आहेत. तर या प्रकरणांमध्ये आज विकी गणात्रा याला ताब्यात घेण्यात आलं आहे, अटकेची कारवाई सुरु आहे. या प्रकरणमध्ये विविध पथक तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून तपास सुरु आहे.


गणपत गायकवाडांच्या मुलाचा शोध सुरु


उल्हासनगर फायरिंग प्रकरणात सहा आरोपी होते. हिल लाईन पोलीस स्टेशनमधील गोळीबार घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये गणपत गायकवाड यांच्या मुलाचाही समावेश दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, ठाण्यातील कळवा पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये आमदार गणपत गायकवाड यांना ठेवण्यात आलं आहे. त्यांची कळव्यातील पोलीस स्टेशन मधील जेलमध्येच वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.  


विकी गणात्रा पोलिसांच्या ताब्यात 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिललाईन पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणातील आरोपी दिवेश उर्फ विकी ललित गणात्रा वय 37 वर्ष याला तपास आणि चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.


गणपत गायकवाडांकडून अन्न त्याग


गणपत गायकवाड यांनी कळवा पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये अन्नत्याग केला आहे. गेल्या चार दिवसांपासून गणपत गायकवाड हे चहा आणि बिस्किटचे सेवन करत आहेत. उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड या घटनेत नसतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे अन्न त्याग केला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. गणपत गायकवाड फक्त चहा-बिस्किट खात असल्याची पोलीस सूत्रांची माहिती दररोज सकाळी उठून योगा देखील करत आहेत. बुधवारी डॉक्टरांनी आमदार गणपत गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्यात तपासणीत त्यांची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.


गोळीबार प्रकरणात आतापर्यंत चार जण अटकेत


भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाइन पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्यासह संदीप सरवणकर, हर्षल केणे यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड, विकी गणात्रा, नागेश बडेकर हे तीन जण फरार होते. या प्रकरणात आता व्यावसायिक आणि भाजप पदाधिकारी विकी गणात्रा याला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. उल्हासनगर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत चार जण अटकेत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ulhasnagar Firing : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी पोलीसच साक्षीदार, जखमी महेश गायकवाडांवर आयसीयुमध्ये उपचार