ठाणे : राज्यात गेल्या काही महिन्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईच्या वरळीतही हिट अँड रनप्रकरणात (Hit And Run) एका महिलेला आपला जीव गमवावा लागला असून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यातच, आता ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतही अपघाताची घटन झाली. या अपघातात एक शिक्षक (Teacher) महिलेचा मत्यू झाला आहे. पतीसह दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याच्या दुचाकीला अवजड ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) पाठीमागे बसलेली महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भिवंडीतील डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाण पुलावर बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेने शहरात हळहळ पसरली असून शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड ट्रक रस्त्यावर येत असल्याने अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तेहसीन शहाबाज अंसारी वय (अंदाजे 25 वर्षे) असे महिलेचे नाव असून सदर महिला आपल्या पतीसह महापोली गावातील एका शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. मागील वर्षभरापूर्वीच तिचा विवाह झाला होता. बुधवारी हr महिला पती शहाबाज अंसारी यांच्यासह दुचाकीवरुन वंजारपट्टी नाका येथील डॉ.एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर आली असता अवजड ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
सुदैवाने या अपघातात पती शहाबाज हा वाचला असून त्यास जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका मिळण्यासाठी शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाच भर दुपारी अवजड वाहने उड्डाणपूलांवरून सोडलीच कशी जातात? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. तसेच, या अवजड वाहनांमुळे शिक्षक महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यूस अवजड वाहने व वाहतूक पोलिसांचा दुर्लक्षितपणाचा कारणीभूत असल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला आहे. तसेच, या अपघातातून तरी वाहतूक पोलीस धडा घेणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.