पुणे : पुणे शहरात महिला तसंच मुलींवरील अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बंडगार्डन परिसरात मुलींसोबत गैरप्रकारच्या एक नव्हे तर तीन घटना घडल्या आहेत. पबमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या ग्रुपमधील तरुणीची एका टोळक्याने छेड काढली. तर याच परिसरातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये 19 वर्षीय तरुणीसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना घडाली. याशिवाय पीएमपीएमएलच्या वाहकाने 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


पबच्या बाहेर मुलीची छेड, मित्रांना बेदम मारहाण
बंडगार्डन परिसरातील पबमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या ग्रुपमधील मुलीची एका टोळक्याने मध्यरात्री छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी झालेल्या वादात टोळक्याने तिच्या दोन मित्रांना बेदम मारहाण देखील केली. 20 वर्षीय तरुणाच्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी शुभम शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांवर भादवी कलम 395, 397, 509, मुंबई पोलीस अॅक्ट कलम 37 (1), (3)सह 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुण हा येथील राजा बहादुर द मिल्समधील एका पबमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो. त्यांचा एक ग्रुप रात्री असतो. दरम्यान, रात्री साडे तीनच्या सुमारास पबच्या पार्किंग परिसरात मैत्रिणीसोबत जात होता. त्यावेळी दोन मुलं इथे उभी होती. त्यातील एकाने शिट्टी वाजवून मुलीवर अश्लील कमेंट केली. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी या दोघांनी तक्रारदार तरुण आणि त्याच्या मित्राला मारहाण केली. वाद ‌वाढल्यानंतर दोघा आरोपींनी आणखी 8 ते 10 मुलांना तिथे बोलावलं. आरोपींनी दोघांना लोखंडी चैनने मारहाण करुन जखमी केल. तसंच गळ्यातील चैन आणि पाकिट चोरल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.


हॉटेलच्या पार्किंगमध्ये तरुणीला मारहाण
बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 2BHK हॉटेलच्या पार्किंगमध्ये एका 19 वर्षीय तरुणीसोबत पहाटे अडीच वाजता अश्लील कृत्य करण्यात आलं. इतकंच नाही तर या तरुणीचा हात मुरगळून तिला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. 13 मार्च रोजी पहाटे अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी ओहनसिंह सहानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी तरुणी मित्रांसोबत जेवण करुन हॉटेलच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत थांबली होत. यावेळी त्यांच्या बाजूला आठ ते दहा व्यक्ती भांडण करत होते. त्यातील आरोपी हा तरुणीच्या जवळ आला. त्याने तिचा डावा हात धरुन जवळ ओढले आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं. तरुणीच्या मित्राने विरोध केला असता आरोपीने त्याला मारहाण करत शिवीगाळ केली. 13 मार्च रोजी घडलेल्या घटनेनंतर तरुणीने अखेर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गोरड अधिक तपास करत आहे. 


PMPML च्या वाहकाकडून अल्पवयीन तरुणीचा विनयभंग
एमपीएमएलच्या स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा वाहकाने विनयभंग केला. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन गोडगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहकाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तक्रारदार तरुणी स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर बसने प्रवास करत होती. यावेळी आरोपी वाहक तिच्या बाजूला थांबून मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडला. परंतु तक्रारदार काहीच न बोलता बाजूलाच उभ्या राहिली. दरम्यान काही वेळानंतर बसमध्ये आलेल्या तिकीट चेकरकडे या तरुणीने वाहकाच्या वर्तनाविषयी तक्रार केली. दरम्यान तिकीट चेकर निघून गेल्यानंतर तरुणीचा राग मनात धरुन आरोपीने तिच्या कमरेला हात लावला. आरोपीने हा प्रकार तीन वेळा केला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला तातडीने अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.