औरंगाबाद : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना औरंगाबाद शहरातील बाजीपुरा भागात घडली आहे. याप्रकरणी आरोपी पती शेख खलील याला जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे. अंजुम खलील शेख असं मृत पत्नीचं नाव आहे तर शेख खलील शेख इस्माईल असं आरोपी पतीचं नाव आहे. चारित्र्याच्या संशयावरुन भाड्याने घेतलेले घर रिकामे करण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. यावेळी पतीने पत्नीच्या डोक्यात मोठा दगडी पाटा घातला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. 


आरोपी शेख खलील शेख इस्माईल हा खाजगी बसवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. 2009 मध्ये त्या दोघांचा विवाह झाला होता. त्यांना नऊ आणि सात वर्षांची दोन मुले आहेत. मात्र तो सतत पत्नीला चारित्र्याच्या संशयावरुन शिवीगाळ आणि मारहाण करत होता. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद व्हायचे. खलीलचे हे दुसरे लग्न होते. त्यापूर्वी त्याने वैजापूर येथे एका महिलेशी लग्न करुन तिथेही संसार थाटल होतं. यावरुनही या पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरु होते.


रत्नागिरीत आईच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने अल्पवयीन मुलाने बापाला संपवलं!
घरात वारंवार उडणारे खटके, वडिलांचं आईवर संशय घेणे आणि तु माझा मुलगा नाहीस असं हिणवल्याने अल्पवयीन मुलाने थेट आपल्या बापाला संपवलं. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पुनस गावातील बौद्धवाडी या ठिकाणी 21 मार्च रोजी ही घटना घडली. घरात भांडणं झाली. त्यावेळी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी हातोडा घातला. यामध्ये 40 वर्षीय रविंद्र रावजी कांबळे जखमी झाले. त्यानंतर त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालय इथे उपचारासाठी हलवल्यात आलं पण 22 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. 


धुळ्यात पतीने पत्नीला ठेचून मारलं 
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील डांगरशिरवाडे इथे भिल्ल आदिवासी समाजातील दिलीप हिराजी सोनवणे यांनी चारित्र्याच्या संशयावरुन आपल्या 48 वर्षीय पत्नीचा ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दिलीप सोनवणेला अटक केली होती. गावातील लोकांसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत असा आरोप करत दिलीप सोनवणे पत्नीशी वाद घालत असे. त्यांच्यातील भांडणं नित्याची झाली होती. याचदरम्यान दिलीप सोनवणे पत्नीसह शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते त्यावेळी शेतातच त्यांच्यात वाद सुरु झाला. यामुळे संतप्त झालेल्या दिलीप सोनवणेने शेताच्या बांधावर पत्नीच्या डोक्यावर तसंच तोंडावर दगडाने मारहाण केली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला