नवी मुंबई : BS4 गाड्यांची विक्री करण्यास मार्च 2020 पासून सरकारने बंदी केली होती. यामुळे स्टॉकमध्ये असलेल्या 406 नवीन गाड्या मारूती सुझुकी कंपनीने स्क्रॅपमध्ये विकल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात गाड्या भंगारात न काढता आरोपींनी बनावट चेसी नंबर, कागदपत्र, नंबर प्लेट तयार करून देशांतील विविध राज्यांत विकून टाकल्या होत्या. यातील 151 गाड्या जप्त करण्यात नवी मुंबई क्राईम ब्रान्चला यश आलं आहे. याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.


पुरामध्ये गाड्या भिजल्यामुळे आपण कमी किंमतीत गाड्या विकत असल्याचे सांगून सरकारने बंदी घातलेल्या BS4 गाड्या बनावट कागदपत्र, चेसी नंबर तयार करून सर्वसामान्य लोकांना विकणारी आंतरराज्यीय टोळी अटक करण्यात नवी मुंबई क्राईम ब्रान्चला यश आलं आहे. 14 कोटी रूपयांच्या 151 गाड्या संपूर्ण देशातून जप्त करण्यात आल्या असून 9 जणांच्या टोळीला अटक करण्यात आलं आहे. वाढत्या प्रदूषणामुळे भारत सरकारने BS4 इंजिन गाड्यांवर मार्च 2020 पासून विकण्यास बंदी केली होती. यानंतर स्टॉकमधील असलेल्या नवीन 406 गाड्या मारूती सुझुकी कंपनीने कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून भंगारमध्ये विकल्या होत्या. भंगारात विकलेल्या गाड्या मुख्य आरोपी आनम सिध्दीकी याने प्रत्यक्षात तोडून न टाकता परत विक्रीस काढल्या. पनवेल मधील पुरात भिजलेल्या गाड्या असल्याचे दाखवत आरोपींनी कमी किंमतीत BS4 इंजिन असलेल्या गाड्या संपूर्ण भारतात विकल्या. यासाठी बनावट चेसी नंबर, इंजिन नंबर , कागदपत्र , गाडी नंबर तयार करून त्या सर्वसामान्यांच्या गळ्यात मारल्या. स्वस्तात गाड्या मिळत असल्याने अनेक लोकांनी लाखो रूपये देवून घेतलेल्या गाड्या भंगारात निघाल्या असल्याचे त्यांच्या लक्षातही आले नाही. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, हिमाचल आधी राज्यांत या गाड्या विकण्यात आल्या होत्या. 406 गाड्यांपैकी 151 गाड्या जप्त करण्यात नवी मुंबई क्राईम ब्रान्चला यश आलं असून या प्रकरणी 9 जणांच्या टोळीला अटक करण्यास आलं आहे.


दिल्ली परिसरात विकलेल्या 300 गाड्या नवी मुंबई क्राईम ब्रान्चच्या हाती लागलेल्या आहेत. मात्र त्या गाड्या महाराष्ट्रामध्ये आणायच्या कशा? हा प्रश्न पोलीस यंत्रणेला पडला आहे. दिल्लीतून 300 गाड्या नवी मुंबईत आणण्यास लाखो रूपयांचा खर्च आहे. त्यामुळे संबंधित गाड्या त्याच ठिकाणी जप्त करून ठेवल्या असल्याचे पोलीस यंत्रणेने सांगितले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :