रत्नागिरी : चिपळूणमधील वेहेळे राजवीरवाडीतील महिलांनी एकत्रित येऊन आपल्या पडीक जमिनीवर बारमाही शेती पिकवली आहे. वर्षांतील चार महिने भातशेती केली जाते. त्यानंतर उरलेल्या महिन्यात करायचे काय? जमीन तर पडीकच राहते. त्यासाठी वाडीतील महिलांनी एकत्र येऊन प्रगती आणि भाग्यश्री असे दोन बचत गट निर्माण केले. या दोन्ही बचत गटातील महिलांनी दिशांतर अन्नपूर्णाद्वारे आपल्या पडीक जमीनीत बारमाही शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी लागणारे पाणी, गावातूनच वाहणाऱ्या बारमाही नदीला बंदारा घालून त्या बंदाऱ्याचे पाणी शेतीकडे वळविण्यात आले. त्या पाण्यावर विविध प्रकारची शेती करु लागली.


सहकारातून सामुदायिक शेतीच्या दिशांतर अन्नपूर्णा प्रकल्पातील महिला शेतकऱ्यांनी यंदा सलग पाचव्या वर्षी 25 लाखांची उलाढाल केली आहे. शेतीतून आर्थिक समृद्धी मिळवता येते याचा साक्षात्कार घडवताना या महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनल्या आहेत. आजच्या वैश्विक कोरोना संकटात सारे जग ठप्प झाले असतांना आणि उद्योग व्यवसायातून उत्पनाचे साधन उरले नसतांनाच अन्नपूर्णा प्रकल्पाची ही यशोगाथा शेतीसाठी आशेचा किरण ठरु लागली आहे. प्रगती आणि भाग्यश्री महिला शेतकरी गटानी गेल्या चार वर्षात लाखोंची उलाढाल केली आहे.



शेतीतून महिलांना साधलेल्या आर्थिक सुबत्तेला दिशांतर संथेने खतपाणी घातले. महिलांनी केलेली शेती, सहकार, सामुदायिक आणि नैसर्गिक पद्धत याच जोडीने दलालमुक्त विक्री व्यवस्था अशा दिशांतर संथेच्या पंचसुत्री धोरणातून या महिला आर्थिक उन्नती करीत आहेत. दिशांतर अन्नपूर्णा अध्यक्ष राजेश जोष्टे यांच्या पुढाकाराने अन्न सुरक्षितता आणि विषमुक्त अन्न या उद्दिष्टांसह दुर्बल घटकांतील भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक अशा महिलांसोबत सहकारातून सेंद्रिय शेतीची मुहुर्तमेढ रोवली आहे. शेतीसाठी पावर टिलर, मोबाईल राईस मिल, बी-बियाणे, जैविक खत निर्मिती, मल्चिंग, ठिबक सिंचन अशी आधुनिक तसेच वेलवर्गीय भाज्यांसाठी पारंपरिक शेती तंत्राची उभारणी करून देण्यात आली आहे.


महिलांनी सहकारातून 25 एकर क्षेत्र बारमाही शेतीखाली आणले आहे. मुळा, पालक, माठ, चवळी, वाल, घेवडा, मिरची, भेंडी, कोबी, फ्लॉवर, वांगी, दुधी, झेंडू, कलिंगड अशी दर्जेदार शेत उत्पादनांची निर्मिती सुरु आहे. अन्नपूर्णा प्रकल्पातून आपल्यापर्यंत ताज्या विषमुक्त भाज्या आणि फळे आणण्याचा उपक्रम गेली 4 वर्षे सुरु आहे. जवळच उपलब्ध असलेली चिपळूणची बाजारपेठ. याबाजारपेठेत इथे पिकवणाऱ्या विविध फळभाज्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सध्या या हंगामात कलिंगडाच्या पिकाला बाजारपेठेत खूप मागणी आहे. असंच काम इतर काही गावांतून सुरु आहे.