नागपूर : पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा व त्याच्या टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. डी आर उर्फ सोपान कुमरे असं अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचं नाव असून त्याच्यासोबत विक्की खापरे, दिनेश निखारे, रामकृष्ण म्हसरकर आणि विनोद मसराम या चार सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.


याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीने केलेल्या धाडसामुळे भोंदू बाबाचा भांडाफोड झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अल्पवयीन मुलगीसोबत भोंदू बाबाच्या टोळीतील विक्की खापरे नावाच्या तरुणांसोबत ओळख झाली होती. विक्कीनं त्या अल्पवयीन मुलीला आपल्याला एका बाबाकडे जायचं आहे तिथं तो आपल्या तांत्रिक शक्तीने पैशांचा पाऊस पाडून देईल. त्यामुळे तुझ्या कुटुंबातील आर्थिक अडचणी कमी होतील असे स्वप्ने दाखविली.


सुरुवातीला विक्की वर विश्वास ठेवणाऱ्या त्याव अल्पवयीन मुलीला नंतर सर्व प्रकार पाहून शंका आली. तिने नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेत जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. गुन्हे शाखेने सापळा रचत नागपूर चिमूर रस्त्यावर एका शेतावर छापा घालून भोंदूबाबाला अटक केली.


सुरुवातीला डी आर म्हणजेच भोंदू बाबा ने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच आपला गुन्हा कबूल करत तो पैशांचा पाऊस पडण्याचे आमिष दाखवून फसवणूक करतो हे मान्य केले. पोलिसांनी डी आर या भोंदूबाबा सोबत त्याच्या टोळीतील चार सहकाऱ्यांना अटक केली आहे..


पोलिसांना भोंदूबाबा डी आर उर्फ सोपानच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटोही आढळले आहे. त्यामुळे भोंदूबाबानं यापूर्वीही अनेक तरुणीचं शोषण केल्याची शक्यता निर्माण झाली आहे.


पोलीस निरीक्षक सार्थक नेहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार भोंदू बाबा डी आर ने तरुण मुलींना फसवून आणण्यासाठी काही तरूणांना हाताशी धरले होते. आणि त्याकरता तो त्यांना मोठी रक्कम देत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.


त्यामुळे जर तुम्ही ही अशा भोंदू बाबा च्या चक्कर मध्ये अडकले असाल तर फसवणूक होण्याआधीच सावध व्हा...