ठाणे : दिवाळी सणाच्या कलावधीत वृद्ध महिलेला टार्गेट करत सोनसाखळी खेचणार्या इराणी टोळीतील दोन सराईत चोरट्यांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. या चोरांना अटक करण्यासाठी तब्बल 80 किमीचा मागोवा घेणारे सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांनी तपासले. या चोरांनी आधीच अशा प्रकारचे सहा गुन्हे केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून 70 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 5 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवाळी सणाच्या काळात 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास कळव्यातील विठ्ठल मंदिराबाहेर एका 65 वर्षीय वृद्ध महिलेचे दागिने हेल्मेट घातलेल्या दोन दुचाकीवरील चोरांनी पोबारा केल्याची तक्रार दाखल झाली. सदर घटनेनंतर घटनास्थळावरून सीसीटीव्हीचे फुटेज मिळवत तब्बल 80 किमीच्या प्रवासाचा तांत्रिक अभ्यास करून दोघा आरोपीपर्यंत पोलीस पोहचले.
खबऱ्यांच्या नेटवर्कचा वापर
गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकींचा नंबर आणि सीसीटीव्ही फुटेज हे पारसिक खारेगाव, टोलनाका, कल्याण फाटा, वदप, पडघा, वशिंड, शहापूर आणि खर्डी कसारापर्यंत सीसीटीव्हीच्या चित्रांवरून मागोवा काढला. त्यानंतर खबऱ्यांच्या नेटवर्कचा वापर करीत 13 दिवसानंतर दखलन गाव, ता. खर्डी, जि. शहापूर येथून पोलिसांनी 21 नोव्हेंबर, 2023 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास छापेमारी करीत सोनसाखळी चोर मोहमद उर्फ सलमान करीब शहा सैय्यद उर्फ शाफरी (28) रा. दखलन याला अटक केली. त्याच्या चौकशीत त्याचा सहकारी शब्बीर नियामत खान (52 ) रा. इगतपुरी नाशिक याचे नाव समोर आले. त्याला 24 नोव्हेंबर, 2023 रोजी खर्डी गावातून ताब्यात घेतले.
दोघा चोरांनी गुन्ह्यात वापरलेली 1 लाख 50 हजाराची दुचाकी आणि 4 लाख 20 हजार रुपयांचे 70 ग्रॅम वजनाचे दागिने असा 5 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. कळवा पोलिसांनी धडक कारवाई आणि सीसीटीव्ही आधारे दोन आरोपीना अटक केली.
शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर झटपट पैसे कमावून श्रीमंत होण्याची स्वप्ने अनेकजण पाहतात. लोकांच्या याच मानसिकतेचा गैरफायदा घेत फसवणुकीच्या अनेक घटना घडत असतात. अशाच एका घटनेतील आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे. डोंबिवलीतील अनेकांना गंडा घालणाऱ्या आरोपीला पुण्यात सापळा रचून अटक करण्यात आली.
डोंबिवली मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 10 टक्के फायदा देण्याचे आमिष आरोपीने दाखवले होते. आरोपीने 150 हून अधिक लोकांना 4 कोटी 60 लाख रुपयाचा चुना लावणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विनय वरटी असे या आरोपीचे नाव असून शेअर मार्केटिंग साठी त्याने डोंबिवलीत शेअर मार्केटिंग चे कार्यालय सुरू केले होते. जवळपास 150 हून अधिक नागरिकांचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले. मात्र गुंतवलेल्या पैशांवर व्याज मिळत नसल्याने अनेक गुंतवणूकदारांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींच्या झेरॉक्स साठी तब्बल 42 हजार रुपये खर्च झाल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा: