ठाणे: कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकालगत असलेल्या इराणी कबिल्यात गुन्हे करून पळालेल्या आरोपीच्या शोधात अंधेरी पोलिसांचे पथक गेले असता, इराणी कबिल्यातील महिला, पुरूषांच्या हिंसक जमावाने अचानक पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात 10 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात इराणी वस्तीतील 17 हल्लखोर आणि त्यांचे 15 अनोखळी साथीदारांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरी भागात झालेल्या एका चोरीच्या प्रकरणात हसन अजीज इराणी आणि जाफरी युनिस इराणी उर्फ बड्डा व इतर दोन आरोपीचा शोध घेत असतानाच पोलीस पथकाला हे चोरटे इराणी वस्तीत लपून बसल्याची खबर मिळाली होती. या माहितीची खात्री पटल्यावर गुरुवारी मध्यरात्री अंधेरी पोलिसांचे एक पथक इराणी वस्तीत आरोपीच्या शोधासाठी आलं होतं. त्यावेळी स्थानिक खडकपाडा पोलिसांचे पथकही सोबत होते. त्यामुळे तिन्ही फरार आरोपींना अंधेरी पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.
पोलीस पथकावर हल्ला, दोन आरोपी फरार
दुसरीकडे पोलीस वस्तीत शिरल्याची माहिती मिळताच इराणी आरोपीच्या कुटुंबीयांनी ओरडा करून वस्तीला जागे केले. त्यानंतर अचानक वस्तीमधील महिला, पुरूषांच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक, दांडके घेऊन पोलिसांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 10 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याने अचानक झालेल्या या हल्ल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
हल्ल्यावेळी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपी फरार झाले तर एक आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. मुंबई, ठाणे, रायगडसह राज्याच्या विविध भागात नियमित विविध गुन्हे करून सराईत गुन्हेगार आंबिवली रेल्वे स्थानक लगत असलेल्या इराणी कबिल्यात वास्तव्य करून असतात. विशेष म्हणजे गेल्या 30 ते 35 वर्षापासून या इराणी वस्तीत शेकडो गुन्हेगार पोलिसांनी अटक केली आहे.
आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ आणि आडबाजूने पळून जाण्यासाठी गुन्हेगारांना याठिकाणी सोयीस्कर जागा असल्याने बहुतांशी इराणी गुन्हेगार या वस्तीत आश्रय घेऊन असतात. कल्याण परिसरातील स्थानिक पोलिसांनी या वस्तीमधील इराणी नागरिकांच्या हल्ल्याची माहिती असल्याने ते कौशल्याने या भागातील आरोपीला अटक करतात.
मुंबईचे पोलीस तुकडीने येऊन इराणी वस्तीमध्ये घुसून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. या वस्तीच्या आतील भागाची माहिती नसल्याने इराणी वस्तीमधील नागरिकांनी एकदम हल्ला सुरू केला की पोलिसांची तारांबळ उडते. अशाप्रकारे गेल्या सहा महिन्यात दोन ते तीन वेळा मुंबई पोलिसांवर हल्ले झाले आहेत. मागील अनेक वर्षात अशाप्रकारच्या 50 हून अधिक घटना घडल्या आहेत, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी माहिती दिली आहे.
या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, गुरुवारी मध्यरात्री अंधेरी पोलिसांचे एक पथक गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी आले होते. त्यावेळी अचानक या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केला. 15 हल्लेखोरांसह इतर अनोळखी 15 जणांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307, 399, 353, 332, 333, 336, 224, 225, 427, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे दाखल दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांपैकी आतापर्यंत कोणालाही अटक केली नसून सर्वच आरोपी फरार आहेत. पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत. तसेच पोलीस पथकावर जीवघेणा करणाऱ्या 8 इराणी महिलांवर पहिल्यादांच मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
ही बातमी वाचा: