Thane Crime : मौजमजा करण्यासाठी तरुण पिढी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. अल्पवयीन मुलीने स्वत:चा आणि बॉयफ्रेण्डचा (Boyfriend) वाढदिवस साजरा करण्यासाठी घरातील दागिन्यांवरच (Jewellery) डल्ला मारला आणि आपण यात अडकू नये, यासाठी आपल्याच अल्पवयीन मित्रावर ब्लॅकमेल (Blackmail) केल्याचा आरोप केला. पोलिसांनी मित्राला अटक केली. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. ठाण्यातील (Thane) कापूरबावडी परिसरातील ही घटना आहे.


अल्पवयीन मित्राविरोधात तक्रार, चौकशीअंती खरा प्रकार समोर


7 जानेवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात एका इसमाने एका अल्पवयीन मुलाच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्याने म्हटलं होतं की, "संबंधित मुलाने आपल्या अल्पवयीन मुलीला तिचे अश्लील फोटो काढून ते वायरल करण्याची धमकी देत तिला घरातील दागिने चोरण्यास प्रवृत्त केलं. यानंतर कापूरबावडी पोलिसांनी तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप असलेल्या त्या अल्पवयीन मित्राला तात्काळ ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली. त्याने पोलीस चौकशीला घाबरुन त्याच्या ओळखीच्या प्रगती ज्वेलर्सचे नाव सांगून तिथे दागिने विकल्याचं सांगितलं. याची शहानिशा करण्यासाठी पोलीस मुलाला प्रगती ज्वेलर्सकडे घेऊन गेले असता हा अल्पवयीन मुलगा त्या दुकानात आलाच नसल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची विश्वासात घेऊन कसून चौकशी केली तेव्हा खरा प्रकार समोर आला.


स्वत:चा आणि बॉयफ्रेण्डचा वाढदिवस करण्यासाठी घरात चोरी 


अल्पवयीन मुलीने तिचा खास मित्र असणाऱ्या आलोक राऊत (वय 18 वर्षे) आणि स्वत:ला वाचवण्यासाठीच हा सर्व बनाव केल्याचे उघड झालं. मुलीचा आणि आलोकचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करता यावा म्हणून मुलीनेच स्वतःहून घरातले दागिने चोरले आणि ते मित्र आलोकच्या साहाय्याने मानपाडामधल्या एका ज्वेलर्सला विकले. ते दागिने विकून 53 हजार रुपये आले. आलेल्या पैशांनी दोघांनीही मस्त पार्टीही केली. मात्र जेव्हा घरात चोरी झाल्याचं उघडकीस आलं, तेव्हा मुलगी प्रचंड घाबरली आणि तिने आपल्या पहिल्या अल्पवयीन मित्राला बळीचा बकरा बनवायचे ठरवलं. मात्र कापूरबावडी पोलिसांनी केलेल्या अत्यंत संयमित आणि सखोल तपासाने एक  अल्पवयीन मुलगा निर्दोष होता हे सिद्ध झाले.


बॉयफ्रेण्डसह दोघे अटकेत, मुलीची बालसुधारगृहात रवानगी


पोलिसांनी मुलीचा बॉयफ्रेण्ड आलोक राऊत आणि दागिने चोरीचे असल्याचं माहित असूनही ते विकत घेणाऱ्या ज्वेलर बासुकी सुरेंद्र वर्माला अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 380 (घरात चोरी) आणि 411 (चोरीची मालमत्ता मिळवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी दिली. तर कापूरबावडी पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. 


हेही वाचा


प्रेमात ब्रेकअप! संतापलेल्या तरुणानं प्रेयसीच्या नव्या प्रियकराची केली हत्या, कल्याणमध्ये चौघांना अटक