कोल्हापूर : कोल्हापूरच्या हातकणंगले इथल्या बेपत्ता झालेल्या व्यवसायिकाची राधानगरी तालुक्यात हत्या झाल्याचे समोर आले आहे. दीपक हिरालाल पटेल असं तरुण व्यावसायिकाचे नाव असून त्यांचे 18 दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला 18 दिवसानंतर हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथल्या पूर्वेकडील दाट जंगलामध्ये दीपक यांचा मृतदेह पुरला होता. त्यावर दगड ठेवले होते. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेऊन सीपीआर रुग्णालयात आणला. यावेळी नातेवाईकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर पोलिसांनी तात्काळ पावले उचलली असती तर दीपक यांचा जीव वाचला असता असा आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे.
पंधरा लाख रुपयांच्या खंडणीसाठी दीपकचं अपहरण झाल्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे त्यांचा शोध सुरु झाला. पटणकोडोली या ठिकाणी त्यांची मोटरसायकल मिळाली होती. तर मोबाईल फोनचे लोकेशन सीमा भागामध्ये दाखवले होते. आपलं अपहरण झाल्यानंतर सलग दोन दिवस दीपकने नातेवाईकांबरोबर बोलून 15 लाखांची व्यवस्था करुन माझी सुटका करावी असे सांगितलं होतं. त्यानंतर मात्र दीपक यांचा फोन बंद येऊ लागला.
आठ दिवसांपूर्वी दीपक यांचा मोबाईल बेळगाव-सोलापूर एसटी बसमध्ये सीटच्या खाली सापडला. हातकणंगले पोलिसांना हा मोबाईल मिळताच कॉल डिटेक्शनवरुन तपास यंत्रणा गतिमान झाली आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने खुनाचा उलगडा केला.
हे ही वाचा