जशपूर : खुल्लम खुल्ला प्यार करे हम दोनो, इस दुनिया से नही डरेंगे हम दोनो... हे गाणं जितकं गाजलं, तितकंच या गाण्याच्या साजेसं असं प्रेम करणं एका जोडप्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे. कारण, भररस्त्यात बाईकवरुन जाताना एक जोडपं रोमान्स (love) करताना कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन जोडप्यावर कारवाई केली आहे. झारखंडमधील कटनी-गुमला राष्ट्रीय महामार्गावर एक प्रेमी जोडपं रोमान्स-स्टंट करताना दिसून आलं. विशेष म्हणजे कुनकुरी पोलीस (police) अधीक्षकांनीच स्वत:च्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. 


प्रेमासाठी कायपण म्हणत सध्याची तरुणाई अनेक स्टंट करताना दिसून येते. कधी फेसबुक लाईव्हमधून हे प्रेम व्यक्त होतं, तर कधी धोकादायक सेल्फी पाँईंटवर सेल्फी काढून आपला हक्क बजावला जातो. सध्या बाईकवरच रोमान्स करुन वेगळाच स्टंट करण्याचा नवा फंडा सोशल मीडियातून समोर येत आहे. आता, कटनी-गुमला राष्ट्रीय महामार्गावरील अशीच प्रेमीयुगुलाच्या रोमान्स अन् स्टंटची घटना समोर आली आहे. 


जशपूर पोलीस अधीक्षक शशिमोहन सिंह आपल्या रुटीन दौऱ्यानिमित्ताने कुनकुरी येथून जिल्हा मुख्यालयाकडे जात होते. त्यावेळी, कटनी-गुमला राष्ट्रीय महामार्गावर एक प्रेमी जोडपे बाईकवरच रोमान्स करताना त्यांनी पाहिले. मुलगा बाईक चालवत असताना, त्याची प्रेयसी पेट्रोलच्या टाकीवर मुलाकडे तोंड करुन बसल्याच दिसत आहे. हे पाहिल्यानंतर स्वत: शशिमोहन सिंह यांनीच आपल्या मोबाईलमध्ये बाईकस्वार जोडप्याला कैद केले. त्यानंतर, मोटर व्हेईकल अॅक्टअंतर्गत या दुचाकीस्वार युवकाविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. 


दोघेही लवकरच लग्न करणार


प्रेमी युगूल जोडपे झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्याचे रहिवाशी असून लवकरच लग्न करणार आहेत. आपल्या स्पोर्टस बाईकवरुन हे दोघेही कुनकुरी जिल्ह्याजवळील मयाली येथील धरण पाहायला जात होते. हे धरण पाहून येताना दोघांनी भररस्त्यात फिल्मीस्टाईल रोमान्स करत, बाईक चालवली. दुचाकीचालक विनय साय स्टंट करत रस्त्यावरुन जात होता, त्याचवेळी, एसपी शशिमोहन सिंह यांची नजर जोडप्यावर पडली. त्यामुळे, पोलीस अधीक्षकांनी गाडी थांबवून तत्काळ कुनकुरी पोलिसांना घटनास्थळी बोलवून जोडप्यातील बाईकस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.


500 रुपये दंड अन् समज


कुनकुरी पोलीस स्टेशनच्या प्रभारी मल्लिका तिवारी यांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. 500 रुपयांचा दंड ठोठावून समज देऊन त्यांना सोडून देण्यात आलं. दरम्यान, अशारितीने रस्त्यावर स्टंट करताना आढळून आल्यास सक्त कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी यावेळी, स्पष्ट केले. 




हेही वाचा


Video: आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावली, मतदारानेही थप्पड मारली, व्हिडिओ व्हायरल; मतदान केंद्रावर राडा