Solapur Latest Crime News Update : प्रेमी युगुलाच्या आत्महत्यामुळे सोलापूर जिल्हा हादरला आहे. आज सकाळी सोलापुरात एका प्रेमी युगुलाने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे सोलापुरात खळबळ माजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.  सोलापूर जवळील कवठे गावात प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. दोन्ही कुटुंबात दु:खाचे वातावरण असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलीस करत आहेत. 


सोलापुरात एकाच झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेतील मृत मुलगी ही अल्पवयीन आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. सूरज चव्हाण असे या घटनेत मुत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सूरज हा मोहोळ तालुक्यातला रहिवासी आहे. गेल्यावर्षी त्यांचं प्रेमाचं सूत जुळलं होतं. पण कुटुंबियांचा याला विरोध होता.


प्राथमिक माहितीनुसार यातील मृत मुलगी ही मोहोळ तालुक्यात असलेल्या आपल्या मामाच्या गावी मागच्या वर्षी सुट्टीत गेली होती. त्यावेळी सूरज सोबत तिचे प्रेमाचे सूत जुळले. घरच्यांचा या प्रेम संबंधाला विरोध असल्याचे देखील समोर आले आहे. कुटुंबिंच्या विरोधानंतरही ते दोघेही कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आज मात्र या दोघांनीही टोकाचे पाऊल उचलले. कवठे शिवारातील एका लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या आवस्थेत हे जोडपे आढळले. ही घटना तेथील नागरिकांना कळताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळावर कॉलेजची एक बॅग, एक दुचाकी पोलिसांना आढळून आली आहे. गळफास काढून पोलिसानी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत घोषित केले आहे. या घटनेची नोंद सिविल हॉस्पिटल पोलीस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दोघांचे नातेवाईक शासकीय रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले आहेत. कुटुंबियांनी टोहो फोडला होता. सध्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. थोड्याच वेळात मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत.