Jalgaon News update : एकाच वेळी जास्तीचे उत्पादन झाल्यानंतर भाज्यांचे दर घसरून या भाज्या शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विक्री कराव्या लागतात किंवा बऱ्याच वेळा त्या फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळसखेड येथील वंदना पाटील या महिलेने यावर एक उपाय शोधला आहे. वंदना पाटील यांनी भाज्या निर्जलीकरणाचा प्रकल्प उभारला आहे. यातून त्या भाज्यांची पावडर तयार करतात. या व्यवसायातून पाटील यांनी परिसरातील दहा महिलांना रोजगार दिला आहे. शिवाय स्वतः या व्यवसायातून महिन्याला पन्नास हजार रूपयांची कमाई करतात.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळसखेड येथील वंदना पाटील यांच्याकडे पाच एकर शेती आहे. या शेतीमध्ये त्या भाजी पाल्याचं उत्पन्न घेत असतात. मात्र ज्या वेळी भाजी पाल्याचे उत्पादन येते त्यावेळी बाजारात भाज्यांचे दर घसरतात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. यावर उपाय म्हणून भाज्या निर्जलीकरण करून त्याचं मुल्यवर्धन करता येणे शक्य असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाल्यानंतर त्यांनी हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेतून पावणे सहा लाख रुपयांचे कर्ज घेऊन हा प्रकल्प पाटील यांनी सुरू केला आहे.
वंदना पाटील यांनी आपल्या गावातील काही महिलांना सोबत घेऊन गायत्री फूड उद्योग नावाने हा उद्योग सुरू केला आहे. या उद्योगात मागणीनुसार त्या भाज्या कोरड्या करून किंवा त्याची पावडर करून विक्री करतात. यामधे प्रामुख्याने कांदा, टमाटा, बिट, शेवगा पाला, मेथी, पालक, कोथींबीर, कढी पत्ता, आलं इत्यादी भाज्यांच्या समावेश आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचा हा प्रकल्प सुरू झाला आहे. भाज्या कोरड्या करून नायट्रोजन गॅसमध्ये त्याचे व्यवस्थित पॅकिंग केल्यास या भाज्यांची पावडर त्याच्या गुणवत्तेसह एक वर्षापर्यंत सहज राहत असल्याचा दावा वंदना पाटील यांनी केला आहे. शिवाय सौर ऊर्जेच्या माध्यमातून या भाज्या नैसर्गिक पद्धतीने सुकविल्या जात असल्याने त्याचा रंग आणि गुणवत्ता कायम राहत असल्याचं ही वंदना पाटील सांगतात. दिवसागणिक त्यांच्या उत्पादनांना मागणी वाढत असून दर महिना सरासरी दोन लाख रुपयांची त्यांची उलाढाल होत असून सर्व खर्च वजा करून जवळपास पन्नास हजार रुपयांचा नफा मिळत असल्याने भाज्या निर्जलीकरण प्रकल्प त्यांना चांगलाच फायदेशीर ठरू लागला असल्याचे वंदना पाटील यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितले.
ग्रामीण भागात राहत असल्याने शेतीमध्ये काम करण्या शिवाय दुसरे कोणतेच काम इथे मिळत नव्हते. शिवाय आपण शिक्षण घेऊन काहीच उपयोग होत नसल्याची नेहमीच खंत राहायची. मात्र, वंदना पाटील यांनी भाज्या निर्जलीकरण प्रकल्प सुरू केल्यापासून आम्हाला घर संसार सांभाळून या ठिकाणी काम करून रोजगारही मिळविता येत असल्याने हा प्रकल्प आमच्यासाठी फायदेशीर आणि आत्मविश्वास देणारा ठरला असल्याचं या ठिकाणी काम करणाऱ्या कल्पना पाटील आणि अर्चना सोनवणे यांनी सांगितले.