Delhi Murder Case : दिल्लीतील ( Delhi ) श्रद्धा वालकर ( Shraddha Vikas Walkar ) हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात आरोपी आफताब अमीन पुनावालाची ( Aftab Amin Poonawalla ) पॉलिग्राफ  ( Polygraph ) चाचणी होईल, त्यासाठी पोलिसांना न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. त्यानंतर त्याची नार्को टेस्टही ( Narco Analysis Test ) करण्यात येईल. या दोन्ही चाचण्यांमध्ये पोलीस आफताबला अनेक प्रश्न विचारतील आणि त्याच्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करतील. पॉलिग्राफ चाचणी  ( Polygraph ) आणि नार्को चाचणी ( Narco Analysis Test ) म्हणजे नक्की काय ते वाचा.


पॉलिग्राफ चाचणी  ( Polygraph ) आणि नार्को चाचणी ( Narco Analysis Test ) करण्यासाठी आधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता दोन्ही चाचण्या केल्या जातात. 


पॉलिग्राफ चाचणी म्हणजे काय? ( What is Polygraph Test ? )


पॉलिग्राफ चाचणी ( Polygraph ) दरम्यान आरोपीला पोलीस वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. यावेळी ब्लड प्रेशर, हार्ट रेट, पल्स रेट आणि शरीरवर येणार घाम तसेच हातापायांची हालचाल यावरून व्यक्ती खरं बोलतो आहे की नाही हे तपासलं जातं. मात्र या चाचणीमध्ये आरोपीने सांगितलेल्या गोष्टी कितपत सत्य आहे, हे सांगणं कठीण आहे. 


पॉलिग्राफ चाचणी वेळी आफताबला पोलीस वेगवेगळे प्रश्न विचारतील. या चाचणीनंतर आफताबने सांगितलेल्या माहितीची पोलीस उलट तपासणी करतील. आफताबने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पोलीस तपास करतील.


पॉलिग्राफ चाचणी कशी केली जाते? 


पॉलीग्राफ चाचणी दरम्यान, मशीनचे चार किंवा सहा पॉइंट व्यक्तीच्या छातीवर आणि बोटांना जोडलेले जातात. व्यक्तीला आधी काही सामान्य प्रश्न विचारले जातात. यानंतर त्याला गुन्ह्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यादरम्यान मशिनच्या स्क्रीनवर मानवी हृदयाचे ठोके, रक्तदाब, नाडी यांचं निरीक्षण केले जाते. चाचणीपूर्वीही व्यक्तीची वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानंतर त्याचे हृदयाचे सामान्य ठोके, रक्तदाब, नाडीचे प्रमाण नोंदवले जाते.


पॉलिग्राफ चाचणीमध्ये प्रश्न विचारले जातात. उत्तर देणारी व्यक्ती खोटं बोलत असेल तर त्यावेळी त्याच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब, नाडीची कमी होते किंवा वाढते. कपाळावर किंवा तळहातावर घाम येऊ लागतो. यावरून ती व्यक्ती खोटे बोलत असल्याचं समजते. जर एखादी व्यक्ती सत्य बोलत असेल तर त्याच्या सर्व शारीरिक हालचाली सामान्य राहतात.


नार्को चाचणी म्हणजे काय? ( What is Narco Analysis Test?) 


नार्को चाचणी ( Narco Analysis Test ) करताना व्यक्तीला सोडियम पेंटोथॉल (Sodium Pentothal) नावाचं औषध दिलं जातं. त्यामुळे व्यक्तीला गुंगी येते. सोडियम पेंटोथालला ट्रुथ सीरम असंही ( Truth Serum ) असंही म्हणतात. या औषधाचं प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने दिलं जातं. या औषधामुळे व्यक्तीला गुंगी आल्याने त्याला खोटं बोलता येत नाही, कारण गुंगीत असताना व्यक्तीला खरं आणि खोटं यामधील फरक कळत नाही. अशावेळी व्यक्तीच्या डोक्यात जे असतं, तो ते सर्व खरं खरं सांगतो. 


कशी केली जाते नार्को चाचणी?


नार्को टेस्ट म्हणजे नार्को ॲनालिसिस चाचणी. नार्को टेस्ट 100 टक्के अचूक असेलच असे नाही. कारण नशेच्या अवस्थेत माणूस कधी कधी चुकीची उत्तरंही देतो. कधी कधी तो कथा रचायला लागतो. अशा परिस्थितीत प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने योग्य पद्धतीने प्रश्न विचारला तर व्यक्तीही योग्य उत्तर देऊ शकतो. कारण प्रश्न विचारण्याचीही एक सौम्य पद्धत असते. काही लोक याला सॉफ्ट वे ऑफ थर्ड डिग्री असंही म्हणतात. या चाचणीदरम्यान मानसशास्त्रज्ञ व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. तपास अधिकारी किंवा फॉरेन्सिक तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञांसोबत आरोपीला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतात.


नार्को चाचणीपूर्वी त्या व्यक्तीची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. व्यक्तीची शारीरिक स्थिती तपासली जाते. यानंतर, त्याचे वय, लिंग आणि इतर वैद्यकीय परिस्थितींच्या आधारावर, त्याला सोडियम पेंटोथॉल औषधाचा डोस दिला जातो. डोस जास्त असल्यास त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, त्यामुळे ही चाचणी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केली जाते.