Online Game : ऑनलाइन गेमच्या चक्रव्यूहात अडकल्यामुळे मुंबईच्या तेरा वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेत असताना मुलांकडे काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. चेतन खानोलकर 13 फेब्रुवारीला संध्याकाळी आपल्या तीन वर्षाच्या लहान मुलीला घेऊन पत्नीसोबत फिरायला गेले होते. कारण घरी असलेल्या तेरा वर्षांच्या तीर्थेशला एकट्याने अभ्यास करता यावा. चेतन आपल्या दुचाकीवरून जात असताना सात वाजून 22 मिनिटांनी त्यांचा मोबाईल वाजला. मात्र दुचाकी चालवत असल्यामुळे त्यांनी तो कॉल उचलला नाही आणि तिथेच नियतीने त्यांचा घात केला.


तीर्थेश खानोलकर, हा चेतन खानोलकर यांचा फक्त 13 वर्षांचा मुलगा. आज तो हयात नाही कारण 13 तारखेला संध्याकाळी कोणी घरात नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शाळेत नेहमी पहिला नंबर येणारा तीर्थेश, क्रिकेटमध्ये पण निपुण होता. 14 तारखेला त्याचे अंडर 14 संघातील सिलेक्शन होते. पण त्याआधीच त्याने जीवन संपवले. चेतन यांनी मिस-कॉल पाहून तीर्थेशला अनेक वेळा कॉल केले, मात्र त्याने कॉल उचलला नाही, त्यामुळे ताबडतोब घरी आल्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते कोणालाही विश्वास बसणार नाही असेच चित्र होतं.


हे सर्व कशामुळे झाले, तर एका ऑनलाइन गेममुळे. तीर्थेश गेल्या काही महिन्यांपासून फ्री फायर नावाचा एक ऑनलाइन गेम खेळत होता. याच गेममधल्या टास्कमुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी आणि त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. कारण याच गेममधील एका कॅरेक्टर प्रमाणे त्याने देखील तोंडाला अर्धवट रुमाल बांधला होता, त्याच्या तोंडात कापडाचा बोळा देखील होता.


ज्यावेळी तीर्थेश याने आत्महत्या केली त्यावेळी फ्री फायर नावाचा गेम त्याच्याच वर्गातले आणखी सहा विद्यार्थी देखील खेळत होते. या सर्वांची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे. तसेच तीर्थेश याचा मोबाईल देखील पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे. त्यातून त्याच्या आत्महत्येचं गुपित उलघडेल अशी शक्यता आहे.


फ्री फायर गेममुळे या आधी देखील काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जगातील अनेक देशांमध्ये हा गेम बॅन करण्यात आला आहे. केंद्र सरकारने देखील 14 फेब्रुवारीला हा गेम बॅन केला. मात्र त्याच्या एक दिवस आधीच तीर्थेश हे जग सोडून निघून गेला होता.


कदाचित केंद्र सरकारने फ्री फायर गेम बॅन करण्याचा निर्णय एक दिवस आधी घेतला असता तर? कदाचित चेतन खानोलकर यांनी तीर्थेश यांनी केलेला तो शेवटचा कॉल उचलला असता तर? आज तीर्थेश हा आपल्या सोबत असता, मात्र दुर्दैवाने असं काहीच झालं नाही.



हे ही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha