Washim News वाशिम :  सध्या देशभरातली स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोलकात्यात (Kolkata) डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण, बदलापुरातील (Badlapur Crime) चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण दोन्ही घटनांनी देश पुरता हादरून गेलाय. अशातच राज्यातील अनेक प्रकार आता पुढे येऊ लागले आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांचे प्रकरण ताजे असतानाच वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातून अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे. यात रिसोड (Risod) शहरालगत असलेल्या वस्तीतील एका 14 वर्षीय बालिकेवर  अपहरण करून  तीन नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय. 


 आधी अपहरण, नंतर तीन नराधमांनी केले लैंगिक अत्याचार


वाशिमच्या रिसोड शहरालगत असलेल्या  वस्तीतील  एका  14 वर्षीय  बालिकेवर  अपहरण करून  तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान ही घटना  21 ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास घडलीय. परिणामी, पिडीत बालिकेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून रिसोड पोलिसात  या प्रकरणी गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. तर  पीडितेच्या  जबानीवरून पोलिसांनी तीन नराधम आरोपीना अटक केली असून पोलिसांनी या घटनेत अधिक चौकशी केली असता,  पिडीत बालिकेचे या पैकी एका आरोपीशी मैत्रीचे  संबध होते, अस उघड झालंय. पोलिसांनी भारतीय दंड संहिता  395, 224 कलम 137(2)3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वेय गुन्हा दाखल केलाय. तर गुन्ह्यात वैद्यकीय अहवाल आल्यानंतर  गुन्ह्यात कलम 64(2)(आय)65 (1)  भारतीय न्याय संहिता कलम 45 (एन) 6,8,12  2023 अन्वेय गुन्हा दाखल करून पास्को अंतर्गतही  गुन्हा दाखल केलाय. अशी माहिती वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली आहे. 


शिक्षकाला रोडरोमियो कडून मारहाण


दुसरीकडे अशीच एक घटना वाशिम येथे घडली आहे. यात वाशिमच्या रिठद  येथील परिसरातील 8 ते 10 गावचे विद्यार्थी शाळेत शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येतात. मात्र, वाशिम रिसोड मार्गावरील बस थांब्यावर विद्यार्थ्यांनी घरी परतत असतांना काही रोडरोमियो तरुणींची छेडखाणी करत असल्याचे प्रकरण पुढे आले. दरम्यान शाळेतील एक शिक्षक विद्यार्थिनींना सोडण्यासाठी गेले असता त्यांना काही मुलं छेड काढतांना दिसले. त्यावर शिक्षणाने त्यांना टोकले असता या तरुणांनी चक्क शिक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर या संदर्भात वाशिम ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसात गुन्ह्याची नोंदही करण्यात आली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास वाशिम पोलीस करत आहे.


हे ही वाचा