सांगली : सहा महिन्यापूर्वी पोलिसांना आव्हान देत सांगलीतील (Sangli) रिलायन्स ज्वेलर्सवर (Reliance Jewellers) टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला बिहारच्या पाटणामधून अटक करण्यात आलीय.सुबोध सिंह ईश्वर प्रसाद सिंह असे संशयिताचं नाव आहे. या आरोपीवर विविध ठिकाणी 32 गुन्हे दाखल आहेत. तसेच जेलमधून तो टोळी चालवत असल्याचे तपासात समोर आले होते. डेहराडून येथील रिलायन्स ज्वेलर्स चोरीच्या घटनेमागेही हेच असावेत असा संशय पोलिसांना आहे.
संशयित सुबोधसिंग यास शनिवारी रात्री सांगलीत आणण्यात आले. त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या चौकशीमध्ये आणखीन आरोपी आणि मुद्देमाल हस्तगत केले जाणार आहेत. सांगली पोलिसांनी बिहार जेलमधून या मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली आहे.
वर्दळीचा रस्ता असतानाही दरोडा टाकण्यात टोळी यशस्वी
सांगलीत भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावरील रिलायन्स ज्वेलर्सवर साडेसहा कोटींचा दरोडा टाकणार्या टोळीच्या सूत्रधाराला बिहारमधील बेऊर कारागृहातून अटक करण्यात आली. कारागृहातून तो दरोड्याची सूत्रे इंटरनेटच्या माध्यमातून चालवत होता अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ.बसवराज तेली यांनी दिलीय. रिलायन्स ज्वेलर्स या सराफी दुकानातील सोन्या-चांदी व हिर्याचे दागिने लुटण्याचा प्रकार 4 जून 2023 रोजी भरदिवसा घडला होता. या ठिकाणापासून काही अंतरावरच पोलीस अधिक्षक कार्यालय व विश्रामबाग पोलीस ठाणे आहे. कायम वर्दळीचा रस्ता असतानाही हा दरोडा टाकण्यात टोळी यशस्वी ठरली होती.
आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात 32 गुन्हे दाखल
या प्रकरणी तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीसांच्या पथकाने नऊ आरोपी निष्पन्न केले होते. मात्र, टोळीचा सूत्रधार सुबोधसिंग ईश्वरप्रसाद सिंग (रा. चिश्तीपूर, ता. चंडी, बिहार) हा बिहार मधील बिऊर कारागृहात राहून टोळीला मार्गदर्शन करत असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयातून ताबा घेत त्याला अटक करण्यात आल्याचे अधिक्षक तेली यांनी सांगितले. संशयित आरोपी सुबोधसिंग हा सोन्याचे व्यवहार करणार्या वित्तीय संस्था, ज्वेलरी शॉप, सोने कर्ज देणार्या मुथुट फायनान्स, मणिपुरम गोल्ड यासारख्या वित्तीय संस्थावर देशभरात दरोडे टाकून लूट करणार्या टोळीचा प्रमुख आहे. त्याच्याविरूध्द विविध पोलीस ठाण्यात 32 गुन्हे दाखल आहेत. तसेच खून, खूनाचा प्रयत्न, सरकारी कर्मचार्यावर हे, अवैध शस्त्र बाळगणे, फसवणूक आदी प्रकारचे गुन्हे त्याच्याविरूध्द दाखल आहेत.
हे ही वाचा :