Sangli Crime News : पुण्यातील एका पार्टीने खुनाची सुपारी घेतल्याची भीती दाखवून एका व्यक्तीस रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 12 लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत समोर आला आहे. धमकी देण्यात आलेली व्यक्ती ही प्लॉटिंगचा व्यवसाय करत असून त्यास तुला मारण्यासाठी पुण्यातील पार्टीला मारण्याची सुपारी दिल्याचे सांगत आणि मोबाईलवर फोटो दाखवून  12 लाखाची खंडणी उकळलीय. या प्रकरणी पाच जणाविरूध्द संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अक्तरमिया शेख (रा. सह्याद्रीनगर) असे 12 लाख घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे तर यासीन इनामदार (रा. हडको कॉलनी)असे भीती घातलेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलिसांनी शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. संशयित इनामदार याला अटक देखील केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीतून उर्वरीत चौघांची नावे निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत नेमकी माहिती पुढे येईल. शेख यांची खरोखरच कोणी सुपारी घेतली होती की त्यांना भीती घालून खंडणी उकळण्यात आली हे देखील पोलीस तपासात स्पष्ट होईल.


12 लाख रुपयांची खंडणी उकळली 


संशयित यासीन इनामदार याची फिर्यादी अक्तरमिया शेख यांची ओळख आहे. शेख यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. इनामदार याने शेख यांना दि. १० मे रोजी भेटून त्यांना तुला ठार मारण्याची सुपारी पुण्यातील एका पार्टीकडे देण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामुळे शेख घाबरले. यावेळी संशयित इनामदारने त्याच्या मोबाइलमध्ये आलेला फोटो देखील शेख यांना दाखविला. ज्यांनी सुपारी घेतली आहे त्या पुण्यातील पार्टीशी ओळख असल्याचे सांगितले. तेव्हा घाबरलेल्या शेख यांनी त्यांना भेटून विनंती करू या, असे सांगितले.संशयित इनामदार याने कराड येथे चौघांची भेट घडवन आणली. तेव्हा सुपारी घेतलेल्या चौघांनी फिर्यादी शेख यांच्याकडे 60 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर  17 मे 2024 रोजी फिर्यादी शेख यांना जिवे मारण्याची धमकी देऊन पाच जणांनी तुरची फाटा येथे त्यांच्याकडून 12 लाख रुपयांची खंडणी उकळली. शेख यांनी या प्रकारानंतर सुमारे वीस दिवसांनी संजयनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. पोलिसांनी इनामदार आणि संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इनामदार याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. संशयित चौघांचा शोध सुरू आहे. चौघांच्या अटकेनंतर या प्रकरणाचा  उलगडा होईल, असे संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  बयाजी कुरळे यांनी माहिती दिलीय.