मुंबई :अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अनुजकुमार थापन याच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, अन्यथा मृतदेह नेणार नाही, अशी भूमिका थापनच्या कुटुंबियांनी घेतली आहे. अनुज थापनच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झालं असून त्याचा मृतदेह घेणार नसल्याची भूमिका त्याच्या कुटुंबियांनी घेतली आहे.


सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट


सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी एक अनुजकुमार थापन याने तुरुंगात गळफास घेत आत्महत्या केली होती. अनुज थापनच्या आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह जेजे रुग्णालयात आणण्यात आला आणि गुरुवारी त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. आज अनुजचे कुटुंबीय मुंबईत पोहोचले, तेथे त्यांनी अनुजचा मृतदेह पाहिला आणि त्यांना धक्काच बसला.


आरोपी अनुजच्या कुटुंबीयांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार


अनुजने आत्महत्या केली नसून हा खून असल्याचा आरोप आजोबा जसवंत सिंह यांनी केला आहे. त्यांनी अनुजचा मृतदेह पाहिला असून त्याच्या गळ्यावर लटकल्याचे नाही तर गळा आवळल्याचे निशाण असल्याचा दावा केला. अनुजकुमार थापनचे मामा, आजोबा आणि भाऊ यांच्यासोबत एबीपी माझाच्या प्रतिनिधीने संवाद साधला, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.


CBI चौकशीची मागणी


जसवंत सिंह पुढे म्हणाले की, मुंबई पोलिसांना आमच्यापासून सुटका करुप घ्यायची आहे, म्हणूनच ते आम्हाला अनुजचा मृतदेह घेऊन लवकरात लवकर येथून निघून जाण्यास सांगत आहेत. आमच्याकडे पैसे नाहीत आणि म्हणूनच आम्ही पंजाबमध्ये असताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, ते आम्हाला तिकीट पाठवतील, आम्ही लवकर येथे यावं आणि येथून मृतदेह आमच्या गावी नेऊ आणि त्यासाठी पैसे देण्याचे आश्वासनही दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी आमचे विमानाचे तिकीट काढले, पण आमचा पोलिसांवर विश्वास नाही, तपास सीबीआयने करावा, असं अनुजच्या आजोबांनी म्हटलं आहे.


अनुजच्या खांद्यावर घरची जबाबदारी


अनुज थापनचे मामा कुलदीप बिश्नोई यांनी सांगितलं की, अनुजच्या खांद्यावरच घरची जबाबदारी होती. तोच घर चालवत असे, तो अतिशय गरीब कुटुंबातील असून त्याची विधवा आई, लहान भाऊ आणि लहान बहीण त्याच्यासोबत राहतात. आता अनुज गेल्यानंतर आता त्याचे कुटुंब कोण चालवणार? आमचा यापुढे महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नसून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, तरच आम्हाला न्याय मिळेल, अशी मागणी अनुजच्या मामाने केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ब्रेकिंग : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आरोपीच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम; अहवालात काय म्हटलंय?