Riya Talukdar Case: वर्षभराआधी लग्न, पतीने 25 वर्षीय पत्नीला संपवलं; फ्रीज उघडताच मुंडकं पाहून पोलिसही हादरले, आसाममधील थरारक कांड
Riya Talukdar Case: आसामच्या गुवाहाटीमध्ये 25 वर्षीय रिया तालुकदार-गोस्वामी यांच्या हत्येच्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

Riya Talukdar Case: आसामच्या गुवाहाटीमध्ये 25 वर्षीय रिया तालुकदार-गोस्वामी (Riya Talukdar Case) यांच्या हत्येच्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. मात्र, या हत्येच्या तपासादरम्यान समोर आलेल्या एका कथित दाव्यामुळे हे प्रकरण आणखी भयावह बनले आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी पती रामानुज गोस्वामी याने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह कुत्र्याला खाऊ घालण्याची योजना आखली होती, असा दावा समोर आला आहे. मात्र, काही कारणामुळे त्याची ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. तसेच भविष्यात तुरुंगातून सुटका झाल्यास, पत्नीच्या "शुगर डॅडीची देखील हत्या करेन, असेही आरोपीने म्हटल्याचे समजते. त्यामुळे पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीला संशय होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आधी हत्या, त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कथित योजना- (Riya Talukdar Case)
पोलिसांच्या माहितीनुसार, रिया आणि रामानुज यांच्यात अनेकदा वाद होत होते. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये एका कारणावरून भांडण झाले. याचदरम्यान रामानुजने कथितपणे संतापाच्या भरात धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केली. हत्या केल्यानंतरही हे प्रकरण तिथेच थांबले नाही. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कथित योजना आखली होती. पोलिसांच्या चौकशीदरम्यान मृतदेह कुत्र्याला खाऊ घालण्यासंदर्भातील दावा समोर आला आहे.
फ्रिज उघडताच समोर आले धक्कादायक दृश्य- (Riya Goswami Case)
रिया यांच्या कुटुंबीयांकडून सतत रिया आणि तिच्या पतीला फोन करण्यात येत होता. मात्र, दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. रात्री सुमारे 9.45 वाजता पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. हाटीगाव पोलिस ठाण्याचे पथक बसिष्ठापूर येथील बाय-लेन क्रमांक 4 मधील घर क्रमांक 14 येथे पोहोचले. घरामध्ये पोलिसांना अतिशय धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. रियांची हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान त्यांचे शीर फ्रिजमध्ये काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांची काही बोटेही कापलेली असल्याचे समोर आले आहे. घरामध्ये रक्ताचे डाग आणि अस्ताव्यस्त पडलेले सामान आढळले. घटनास्थळावरून एक धारदार शस्त्र देखील जप्त करण्यात आला असून, याच शस्त्राचा वापर करून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रामानुजने कथितपणे हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नसल्याचेही कथितपणे सांगितले आहे.
विवाहाला अवघे सहा महिने; संबंधांच्या संशयातून हत्या? (Riya Talukdar Case)
पोलीस आता रामानुजला पत्नीच्या कथित संबंधांबाबत इतका संशय का होता आणि हाच संशय हत्येचे खरे कारण ठरला का, याचा तपास करत आहेत. रिया आणि रामानुज यांचा विवाह सुमारे सहा महिन्यांपूर्वी झाला होता. दोघेही गुवाहाटीतील याच अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. आरोपीने पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलीस या कथित विवाहबाह्य संबंधांच्या संशयाच्या दृष्टिकोनातून हत्येचा संभाव्य हेतू तपासत आहेत. तसेच, हत्येच्या वेळी आरोपी नशेच्या अवस्थेत होता का, याचाही तपास सुरू आहे.
20 हून अधिक वेळा रिहॅब सेंटरमध्ये गेला होता आरोपी- (Riya Talukdar Case)
तपासादरम्यान रामानुजच्या अमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित बाबही समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तो 20 हून अधिक वेळा रिहॅब सेंटरमध्ये जाऊन आला होता. वैद्यकीय तपासणीत आरोपीला HIV आणि हेपेटायटिस C असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, या वैद्यकीय स्थितीचा आणि हत्येचा कोणताही संबंध असल्याचे पोलिसांनी म्हटलेले नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी CID, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांची तपासणी करून हत्या होण्यापूर्वी आणि त्यानंतर नेमके काय घडले, याची संपूर्ण साखळी जोडण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत. सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रियांच्या हत्येनंतर आरोपी नेमके काय करणार होता? मृतदेह कुत्र्याला खाऊ घालण्याची खरोखरच योजना होती का, की चौकशीदरम्यान समोर आलेला हा केवळ एक दावा आहे? या भयावह दाव्याचाही पोलिसांकडून तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचे सत्य स्पष्ट होणार आहे.























