कल्याण डोंबिवलीत वाढती बालगुन्हेगारी चिंताजनक; गेल्या 11 महिन्यात 73 गुन्हे, 91 अल्पवयीन पोलिसानी घेतले ताब्यात 

गुन्हेगारीकडे वळणाऱ्या अल्पवयीन मुलाची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. कल्याण परिमंडळ 3 मध्ये गेल्या 11 महिन्यांच्या कालावधीत विविध गुन्ह्यात 91 अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Continues below advertisement

कल्याण : गेल्या काही महिन्यातील आकडेवारीवर नजर टाकली असता कल्याण डोंबिवलीत बालगुन्हेगाराची संख्या कमालीची वाढलेली दिसत आहे. अल्लड वयात गुन्हेगारीकडे वळणाऱ्या अल्पवयीन मुलाची वाढती संख्या चिंतेचा विषय बनत चालली आहे. कल्याण परिमंडळ 3 मध्ये गेल्या 11 महिन्याच्या कालावधीत विविध गुन्ह्यात 91 अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्यावर हत्या, बलात्कार, लुटपाट, गंभीर दुखापत यासारख्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. यामुळे व्यसनाधीनतेबरोबरच गुन्हेगारीकडे वळणाऱ्या या तरूण पिढीला वाममार्गापासून परावृत्त करण्याचे मोठे आव्हान आता पोलीस यंत्रणेसह समाजापुढे उभे ठाकले आहे.

Continues below advertisement

एकीकडे तरुण पिढी नकळत्या वयात व्यसनाधिनतेच्या आहारी जात झटपट पैसे मिळविण्याच्या आमिषाला भुलून अमली पदार्थ विक्रीच्या रकेट मध्ये ओढली जात आहे. दुसरीकडे डोंबिवलीत काही दिवसापूर्वी घडलेल्या अल्पवयीन तरुणीवरील सामुहिक अत्याचार, लूटपाट, हत्या , हाणामाऱ्या अशा गंभीर  गुन्ह्यातील आरोपीमध्ये 17  वर्षाखालील मुलाचा देखील समावेश असल्याचे पोलिसांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

जानेवारी 2021 ते नोव्हेबर 2021 या 11 महिन्याच्या कालावधीत कल्याण परिमंडळ 3 च्या हद्दीतील महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत 7 गुन्ह्यात 11 जणांना, बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 2  गुन्ह्यात 2 जणांना, कोळसेवाडीच्या हद्दीत 21 गुन्ह्यात 26 जणांना, खडकपाडा हद्दीत 1 गुन्ह्यात एकाला, सुशिक्षित समजल्या जाणार्या डोंबिवली शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 गुन्ह्यात 30 जणांना, विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 गुन्ह्यात 6 जणांना, मानपाडा हद्दीत 7 गुन्ह्यात 11 जणांना, टिळकनगर हद्दीत 4  गुन्ह्यात 4 जणांना असे एकून 73 गुन्ह्यात 91 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

यात हत्येच्या गुन्ह्यात 1, बलात्काराच्या गुन्ह्यात 11, धारदार शस्त्राचा धाक दाखवून लूट करणाऱ्या मध्ये 3 तर प्राणघातक मारहाण करत जखमी करण्याच्या गुन्ह्यात 10 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसाकडील उपलब्ध माहितीवरून हाती आली आहे. ज्या वयात मुलांनी खेळ, अभ्यास, व्यायामासारख्या उपक्रमातून स्वताला घडवत सिद्ध करणे अपेक्षित आहे त्याच वयात तरूण पिढी व्यसनाधिनते बरोबरच गुन्हेगारीच्या मोहपाशात ओढली जात उध्वस्त होत असल्याने याला वेळीच आवर घालण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

याबाबत मानसोपचारतज्ञांनी अल्पवयीन मुलांमध्ये वाढती व्यसनाधीनता व वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय आहे. ही वृत्ती अल्पवयीन मुलांमध्ये वाढण्यास अनेक कारणे आहेत. पालकांनी मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे, जर मुलांच्या वर्तनात बदल जाणवला तर त्याचे तात्काळ समुपदेशन करणे देखील गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

लहान मुलं म्हणजे मातीची मडकी, आकार द्याल तशी ती घडतील असा वाक्प्रचार आपल्याकडे प्रसिद्ध आहे. मात्र मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अति वापरामुळे लहान मुलांचे बालपण हरवून गेल्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना आता पालक वर्गाला मुलांबाबत आणखी गांभिर्याने विचार करण्यास लावणारा आहे व्यसनाधीनतेपाठोपाठ लहान मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीतही लक्षणीयरित्या वाढ झाल्याचे पोलीस आकडेवारीवरून दिसून येत असून ज्यामुळे केवळ पालक वर्गच नव्हे तर पोलीस प्रशासनही चिंतेत पडले आहे. 

संबंधित बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola