पुणे : चाकण परिसरात रात्रीच्या शिफ्टसाठी कामावर निघालेल्या एका 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार 13 मे रोजी उशिरा घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या धैर्यामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीस अवघ्या चोवीस तासांत अटक करण्यात आली आहे. मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहचली. त्याचवेळी नराधमाने तिला जबरदस्तीने एका इमारतीच्या मागील बाजूस ओढून नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने प्रतिकार केला, आरोपीला चावा ही घेतला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषाच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसांना याबाबत कळवलं.  दरम्यान आरोपीने आपला कबुली जबाब पोलिसांना दिल्याची माहिती आहे.

चाकण येथील मेदनकरवाडी भागात एका तरूणीला रस्त्यावरून फरफटत नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली आहे. प्रकाश तुकाराम भांगरे (सध्या रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. अकोले, जि. अहिल्यानगर) असे या नराधम आरोपीच नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर, न्यायालयाने त्याला 20 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ‘रस्त्याने जात असलेली महिला मला दिसली आणि मी तिला बाजूला ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला,’ असा कबुली जबाब आरोपीने दिला आहे. 

नेमकं काय घडलं?

पीडित तरूणी नाइट शिफ्टसाठी कंपनीत जात होती. अत्याचाराच्या घटनेबाबात पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त, शिवाजी पवार यांनी माहिती देताना सांगितलं की, "ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तरूणी रात्रपाळीसाठी कामावर जात होती. एका पॉईंट पर्यत त्यांना पायी जावं लागतं, त्या ठिकाणी पिक अप पॉईंटपर्यंत जात असताना आरोपीने पाठलाग केला, एका ठिकाणी त्याने मागून येऊन तोंड दाबलं, त्यानंतर गळा दाबत तिला एका कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला. यादरम्यान त्या रस्त्यावर दोघे जण जात होते, त्यानंतर त्या तरूणीने त्यांना पाहून मोठ्याने आरडाओरडा केला, त्यानंतर तो आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर एका कपलने त्या तरूणीची मदत केली, पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने सहा विशेष तपास पथके तयार केली. पोलिसांनी हद्दीतील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला अटक केली आहे.

दोघे एकमेकांना ओळखत नव्हते

चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पिडीत तरूणीला तातडीने उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केलं. आरोपीचे नाव प्रकाश भांगरे आहे, मुळचा तो आहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहे. त्या दोघांचा यापूर्वीचा कोणताही परिचय नव्हता. दोघे एकमेकांना ओळखत नव्हते, दोघांच्या कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत. ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला, सर्व पथकांनी 18 ते 19 तास तपास करून तांत्रिक बाबीचा आधार घेत आरोपीचा शोध घेतला, अटकेपासून वाचण्यासाठी तो लपून बसलेला होता, मात्र, स्थानिक माहितीच्या आणि तांत्रिक बाबींच्या आधारे त्याला अटक घेण्यात यश आलं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

आरोपीचा कबुलीजबाब

आरोपी अविवाहित असून, तो एका कंपनीत कामगार आहे. घटना घडली तेव्हा तो दारू प्यायलेला होता. ‘रस्त्याने जाताना महिला दिसली आणि मी तिला ओढत बाजूला नेत तिच्यावर बलात्कार केला,’ असा कबुलीजबाब आरोपीने दिलेला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याचे लोकेशन, सीसीटीव्ही, आणि इतर तांत्रिक गोष्टीची मदत घेतली. 

आरडाओरडा केला पण...

पीडितेवर अत्याचार होत असतानाच तिच्यापासून काही अंतरावर काही जण शतपावली करत होते. पीडितेने त्यांना पाहिल्यानंतर मदतीसाठी मोठ्याने आरडाओरडा केला. मात्र, पीडितेचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे पीडितेला कोणाची मदत मिळाली नाही.