Kalyan  Municipal Corporation: एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे कल्याण डोंबिवलीतील तब्बल 4 लाखांहून अधिक मतदारांचे यादीमध्ये छायाचित्रच नसल्याचे समजत आहे. याशिवाय, तब्बल दीड लाखांहून अधिक मतदारांचे नावे वगळण्यात आली आहेत. ज्या मतदारांचे नाव वगळण्यात आली आहेत, ते संबधित पत्यावर राहत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मतदानाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण पश्चिम (4 लाख 78 हजार मतदार), कल्याण पूर्व (3 लाख 57 हजार मतदार), कल्याण ग्रामीण (4 लाख 40 हजार मतदार) आणि डोंबिवली (3 लाख 72 हजार मतदार)  असे चार विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण 16 लाख 49 हजार 270 मतदार आहेत. त्यापैकी  कल्याण पश्चिमेत 1 लाख 22 हजार, कल्याण पूर्वेत 92 हजार 192, कल्याण ग्रामीणमध्ये 82 हजार 364 आणि डोंबिवलीत 1 लाख 17 हजार 92 मतदार अशा एकूण 4 लाख 13 हजार मतदारांची यादीत छायाचित्रे नसल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 1 लाख 67 हजार 909 मतदारांची नावे मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर ते राहत नसल्याने वगळण्यात आल्याचे कल्याणचे प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्याकडून संगण्यात आले. बोगस मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे  फोटो असणे निवडणूक आयोगाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील मतदार याद्या फोटोसह अद्ययावत करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तर, आजपर्यंत कल्याण डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदारसंघ मिळून 4 लाखांपैकी केवळ 7 हजार 770 मतदारांची छायाचित्रे गोळा करण्यात आल्याचेही प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले. छायाचित्रे नसणाऱ्या मतदारांनी संबंधित बीएलओकडे आपली छायाचित्रे जमा करण्याचे आवाहन करतानाच यादीतील पत्त्यावर मतदार न सापडल्यास ती नावे वगळण्याचा इशाराही प्रांताधिकारी भांडे पाटील यांनी दिला आहे.  त्यामुळे अवघ्या 12 दिवसांत 4 लाख मतदारांची छायाचित्रे गोळा होतात की एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांची नावे यादीतून वगळली जातात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.


याबाबत कल्याण पूर्व चे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मतदार यादीत  मतदाराचे फोटो नसताना आणि त्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नसतानाही त्याना मतदान करू दिले जात असल्याने बोगस मतदानाचे प्रमाण सर्वच निवडणुकीत दिसून येते . यामुळेच निवडणुक आयोगाने दुबार नावे, स्थलांतरीत मतदाराची नावे कमी करत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरु केले आहे. हि यादी अद्ययावत झालीच पाहिजे ज्यामुळे खऱ्या मतदारांना मतदानाचा हक्क मिळेल. केवळ कल्याण डोंबिवलीत नव्हे तर देशभरात असेच झले पाहिजे कारण बोगस मतदान रोखण्यासाठी हे गरजेचे आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले.


तर मनसेचे प्रदेश  सचिव इरफान शेख यांनी मतदाराचा हक्क अबाधित राहावा ही मनसेची सुरुवातीपासून भूमिका राहिली आहे. यामुळे मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने कालावधी वाढवून द्यावा. सध्या हे काम बीएलओ कडून केले जात आहे मात्र त्यांच्याकडून फॉर्म भरताना चूक झाली तर मतदाराचे नाव यादीतून वगळले जाते. यामुळेच मतदारांना स्वताचे नाव, पत्ता, फोटो, अपडेट करता यावा यासाठी निवडणूक आयोगाने एक खिडकी योजनेद्वारे सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि नागरिकांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मतदार याद्या आद्ययावत करण्यासाठी मुदत वाढ द्यावी  येणार्या कालावधीत २२ महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत निवडणुकीत लोकशाहीचा थेट संबंध  आहे. जर मतदारा याद्या अद्ययावत झाल्या नाहीत तर लाखो मतदाराचा मतदानाचा हक्क हिरावला जाईल यासाठी एक खिडकी योजना तत्काळ लागू करावी अशी मागणी केली आहे.