रत्नागिरी : कोकणात एखाद्या गँगवॉरवर आधारित चित्रपटाला शोभेल अशी आणि जिल्ह्याला हादरवून सोडणारी गुन्हेगारी विश्वातील घटना घडली आहे. कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या वादानंतर 22 वर्षीय तरूणावर एका टोळक्यानं तलवारीनं सपासप वार केले आहेत. यामध्ये सदरचा तरूण गंभीर जखमी असून त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
ही सारी धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा गावात घडली आहे. या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी निषेधार्थ मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. ही घटना घडल्यानंतर सारखपा गावात तणावपूर्ण शांतता देखील होती. पण पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर मोर्चा स्थगित करत गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Ratnagiri Crime News : रविवारी भांडण, गुरूवारी रात्री हल्ला
रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा गाव. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटाच्या पायथ्याशी हे गाव आहे. गाव शांतताप्रिय आणि सांस्कृतिक वारसा असणारे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गावात कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं . यावेळी कबड्डीचा सामना दिसत नसल्याच्या कारणावरून सागर वैद्य आणि सुशांत सुर्वे या दोन तरुणांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोन दिवस काहीही घडलं नाही. सर्व काही शांततेत सुरू होतं.
गुरूवारी रात्री 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान सुशांत सुर्वे आणि त्याचे वडील संजय सुर्वे यांनी सागर वैद्य याच्यावर अन्य साथीदारांच्या साथीनं तलवारीनं वार केले. जवळपास 10 जण या हल्ल्यामध्ये सहभागी असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. या तलवारीच्या हल्ल्यात सागर वैद्य गंभीर जखमी झाला. पोलिस जागेवर पोहोचले पण, सुशांत सुर्वे आणि संजय सुर्वे फरार आहेत. पोलिस सध्या त्यांच्या मागावर आहेत. जखमी सागरवर सध्या रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही महिन्यांपूर्वी संजय सुर्वे आणि सुशांत सुर्वे हे रत्नागिरीतील साखरपा गावात स्थायिक झाले होते. त्यांनी हॉटेलचा व्यवसाय देखील सुरू केला होता. या दोन्ही पिता-पुत्रांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे. सुशांत आणि संजय सुर्वे हे मुळचे ठाण्यातील रहिवाशी आहेत. पोलिस आता या दोघांचाही शोध घेत असून तपास सुरू आहे.
ही बातमी वाचा: