Pune news :   महावितरणच्या पुणे परिमंडळातील वीज ग्राहकांना त्यांच्या एप्रिल आणि मे महिन्याच्या वीज बिलासह अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी वेगळे बिलं पाठवली आहेत. वीज ग्राहकांनी ही अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे महावितरणने अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरण्यासाठी वीज ग्राहकांना सहा समान मासिक हप्त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सिक्युरिटी डिपॉझिट बिलावर त्या संदर्भातील उल्लेख करण्यात आला आहे. 


महावितरणने भर उन्हाळ्यात ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॅाक दिला आहे.  ग्राहकांना सध्याच्या एका महिन्याच्या सरासरी बिलाऐवजी दोन महिन्यांच्या सरासरी बिलांची रक्कम महावितरणकडे जमा करावी लागणार आहे. सहा महिन्यात ही सुरक्षा ठेव हप्त्यात भरायची आहे.


महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीज पुरवठा संहिता 2021 च्या कलम 13.1 नुसार, वीज ग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. दरवर्षी सिक्युरिटी डिपॉझिटची पुनर्गणना केली जाते आणि त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर नवीन सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम ग्राहकाच्या मागील एका वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे निर्धारित केली जाते. वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिलाच्या बाबतीत सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि तिमाही बिलाच्या बाबतीत सरासरी तिमाही बिलाच्या दीड पट घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. 


तसेच पुणे परिमंडळातील वीज ग्राहकांना एप्रिल महिन्यातील अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे वेगळे बिल दिले जात आहे. बिलामध्ये नमूद केलेली सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम भरण्यासाठी कमाल सहा महिने समान हप्त्यांची तरतूद आहे. यासंबंधीची माहिती सुरक्षा ठेव बिलात नमूद आहे. तसेच, कमी दाबाच्या वीज ग्राहकांसाठी www.mahadiscom.in आणि महावितरण मोबाईल अॅपच्या माध्यमातून अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम घरपोच भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीज ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. राज्यातील सर्व वीजग्राहकांना चालू वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिले देण्यात आली आहेत. त्यावरून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 


महावितरणच्या बनावट एसएमएस कडे दुर्लक्ष करा...


कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या एसएमएस/कॉल/व्हाट्सअॅप संदेशांना प्रतिसाद देऊ नका, असं आवाहन महावितरण करुन करण्यात आलं आहे. महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही. महावितरण केवळ VM-MSEDCL / VK-MSEDCL / AM-MSEDCL / JM-MSEDCL सारख्या SENDER ID वरून एसएमएस पाठवते आणि कोणत्याही वैयक्तिक मोबाइल नंबरवरून एसएमएस पाठवत नाही, असं महावितरण विभागाकडून सांगण्यात  आलं आहे.