Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील (Raigad) रोहा शहरात (Roha) सोमवार दिनांक ८ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने (Crime Branch) मोठी कारवाई केली. एका घरातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये बंदूक, रिवॉल्वर, तलवारी चॉपर, चाकू, दारूगोळा आदींचा समावेश आहे. रायगड पोलिसांनी (Raigad Police) या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
सोमवारी 8 जानेवारी रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली. शहरातील धनगर आळी येथील रहिवासी तन्मय सतीश भोकटे (वय 24) याच्या राहत्या घरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये बंदूक बनवण्याचे साहित्य, एक रिवॉल्वर, 5 बंदूक, 39 काडतूस, तीन तलवारी, 5 लोखंडी काती, एक चॉपर, 5 चाकू, कोयता, 24 दारूगोळाची पाकिटे, शिशाचे छोटे बॉल त्याचबरोबर वन्य प्राण्यांचे अवशेष त्यामध्ये जनावरांचे शिंग, भेकराचे 14 जोड, सांबर 5 जोड, काळवीट 1 जोड, चौसिंगा 2 जोड यांचा समावेश आहे. हे सर्व साहित्य घरामध्ये सापडल्याने रोहा शहरात एकच खळबळ उडालीय.
आरोपीला मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
अमरावतीमध्येही शस्त्रसाठा जप्त
मागील महिन्यात, अमरावतीमध्ये 11 डिसेंबर रोजी पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त केला होता. अमरावती शहरात अवैध घातक शस्त्रे विक्री करणार्या 6 जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या घातल्या. पोलिसांनी 102 खंजर चाकू, 2 चायना चाकू आणि 2 देशी कट्टे जप्त केले. मुंबईहून शस्त्रे आणून अमरावती शहरात विक्री करण्यात येत होती, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना चौकशी दरम्यान दिली.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अब्दुल सोहेल अब्दुल शफी (वय 19 वर्ष, रा. गुलीस्ता नगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे 1 खंजर आणि 2 चायना चाकू मिळाले. त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार टोळी प्रमुख अकरम खान उर्फ गुड्डु वल्द बादुल्ला खान (वय 19 वर्ष, रा. अलीम नगर), टोळी सदस्य फरदीन खान युसुफ खान (वय 21 वर्ष, रा.राहुल नगर), मुजम्मील खान जफर खान (वय 21 वर्ष, रा.गुलीस्ता नगर), शेख सुफियान मोहम्मद अशफाक (वय 19 वर्ष, रा. यास्मीन नगर), जाहेद शहा हमीद शहा (वय 20 वर्ष, रा. लालखडी) असे सहा जणांना अटक करण्यात आली होती.