पुणे : पुण्यातील कोथरुड परिसरातील म्हातोबानगर इथे एका 13 वर्षीय मुलाचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळला. मृत मुलगा विशेष (मुका) असल्याची माहिती आहे. करण गोपाल राठोड असं या मुलाचं नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोथरुडमधील एकलव्य पॉलीटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानाजवळ गुरुवारी (24 मार्च) रात्री 13 वर्षीय करण राठोडचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवलेला आढळला. काल रात्रीच्या वेळी मैदानावर मुलं खेळत असताना त्यांना पोत्यात काहीतरी बांधून ठेवलं असल्याचं दिसलं. त्यांनी पोतं उघडून पाहिलं असता त्यात मृतदेह दिसला. या मुलांनी आजूबाजूच्या लोकांना याची माहिती दिली. नागरिकांनी संबंधित प्रकार पोलिसांना कळवला.
मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. मृत मुलगा हा मुका असून त्याचे आई-वडील मजुरी करतात.
महत्त्वाचं म्हणजे मुलाच्या शरीरावर कुठलाही प्रकारच्या खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू कशामुळे झाला? की त्याचा खून झाला? याचा तपास कोथरुड पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.
कोथरुड पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या माहितीनुसार, "आम्ही मृताची ओळख पटवली आहे. आम्ही खुनाची शक्यता तपासत आहोत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण सांगू शकू. दरम्यान, प्राथमिक तपासाच्या आधारे आम्ही एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मिळालेल्या वेगवेगळ्या लीड्सवर काम करण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या