रत्नागिरी : मागील पाच ते सात वर्षांपासून कोकणात चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण कारखान्याचा. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी रद्द झाल्यानंतर आता राजापूर तालुक्यातील धोपेश्वर, बारसू आणि सोलगांवमध्ये चाचपणी सुरु आहे. दरम्यान, रिफायनरीच्या समर्थनार्थ झालेल्या मेळाव्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले आहेत. नवीन जागेची रिफायनरी रद्द करावी यासाठी आता विरोधकांनी 30 मार्च रोजी राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं आहे. नवीन जागेवरील रिफायनरी रद्द करण्यात यावी. आमचा अद्याप देखील विरोध कायम आहे. यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचं रिफायनरी विरोधकांनी सांगितलं. लक्षणीय बाब म्हणजे 28 ते 30 मार्च दरम्यान युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील आदित्य यांचा दौरा 29 मार्च रोजी असून त्यावेळी देखील त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. रिफायनरी विरोधक यावेळी आदित्य यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आपलं म्हणणं मांडू शकतात. त्यामुळे दौऱ्यावेळी आदित्य यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष असणार आहे. 


24 फेब्रुवारी आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही. त्याबाबत सकारात्मक विचार झाला पाहिजे, असं म्हटलं होतं. पण, कोकणातील प्रकल्प रद्दच झाला का? या प्रश्नाला मात्र त्यांनी उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेबाबत चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आदित्य ठाकरे असून ते पुन्हा याबाबत भाष्य करतात का? आपली भूमिका स्पष्ट करतात का? याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. 


...तर, रिफायनरीचं समर्थन करु : उदय सामंत


स्थानिकांना रिफायनरी हवी असल्यास किंवा स्थानिकांनी रिफायनरीचं समर्थन केल्यास शिवसेना देखील समर्थन देईल अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी इथे गुरुवारी (24 मार्च) संध्याकाळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी लोकांचे काही गैरसमज असल्यास ते दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी देखील पुष्टी जोडली आहे. शिवाय, आम्ही यापूर्वी देखील आमची भूमिका स्थानिकांसोबतची असून यू-टर्न घेण्याचा प्रश्नच नसल्याचं देखील सामंत यांनी म्हटलं. 


यापूर्वी 21 फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे यांनी स्थानिकांचं म्हणणं पाहून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौऱ्यावेळी दिली होती. त्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिवसेनेने स्थानिकांना प्रकल्प हवा असल्यास विचार करण्याची भूमिका यापूर्वी घेतलेली आहे. पण, सध्या एकामागून एक नेते रिफायनरीबाबत घेत असलेली भूमिका आणि त्यांच्याकडून होत असलेला शब्दांचा खेळ पाहता शिवसेना मवाळ होताना दिसत आहे का? असा सवाल देखील विचारला जात आहे.