Pune Crime Police News Update : गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सिरियल्स बघून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला माहीत असतात.  पण गुन्हे करून त्याचा उपयोग कथा लेखनासाठी (Story Writing) करण्याचा प्रकार पुणे सायबर पोलिसांनी (pune cyber Police) उघडकीस आणलाय. या लेखकाने केलेले गुन्हेही साधेसुधे नसून गेल्या दहा वर्षांपासून तो हाय प्रोफाइल महिलांशी नातं जोडून देतो असं सांगत बड्या बड्यांना फसवत असल्याचं समोर आलंय. पुण्यातील एका 76 वर्षांच्या व्यवसायिकाला तब्बल साठ लाखांचा गंडा या लेखकाने घातल्यावर सायबर पोलिसांनी या कथित लेखकाला अटक केलीय. मात्र आता या सगळ्याची देखील एक कथा बनेल असं हा लेखक पोलिसांना सांगतोय. अनुप मनोरेची दोन अतिशय भिन्न रूपं आहेत. अगदी एखाद्या थरार कथेमध्ये शोभतील अशी.


त्याच्या पहिल्या रूपात तो मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिखाण करणारा एक लेखक आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील बड्या कलाकारांसोबत त्याची उठबस आहे. हिंदी रंगभूमीवर त्यानं शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावर आधारित रंग रसिया बालम या नाटकात काम केलंय. एका यशस्वी कलाकाराचं चकचकीत आयुष्य तो जगत आलाय. मात्र याच अनुप मनोरेचं दुसरं रूप तेवढंच विदारक आहे. कारण  गेल्या दहा वर्षांपासून हाय प्रोफाइल महिलांशी शरीर संबंध प्रस्थापित करून देतो असं सांगत तो हजारो लोकांना फसवत आलाय. त्यासाठी त्याने गणेश शेलार हे खोटं नाव धारण केलं होतं. फसवणुकीसाठी त्यानं निवडलेला मार्ग देखील शेरलॉक होम्स किंवा व्योमकेश बक्षीच्या कथेला साजेसा असाच आहे. 'एंजॉय करा आणि हजारो रुपये कमवा', 'मीनाक्षी फ्रेंडशिप क्लब', 'रोड टू हेवन' अशा शीर्षकांसह तो वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देत असे आणि बडे मासे आपल्या जाळ्यात ओढत असे.  


महिलेचं व्हर्च्युअल अकाऊंट तयार करायचा


सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता माळी सांगतात की,  एंजॉय करा आणि हजारो रुपये कमवा अशा प्रकरच्या जाहिराती हा आरोपी वृत्तपत्रांमध्ये करत असे. त्यासोबत तो मोबाईल नंबर देत असे. जाहिरात पाहून फोन करणाऱ्या पुरुषांना अनुप मनोरे हाय प्रोफाइल महिलांशी मिटिंग करून देतो असं सांगायचा. त्यानंतर एखाद्या महिलेचं व्हर्च्युअल अकाऊंट तो तयार करायचा आणि त्यावरून समोरच्या पुरुषाशी तो संपर्क करायचा. यामार्फत येणारे पैसे स्वीकारण्यासाठी तो एखाद्या महिलेच्या नावावर असलेल्या बँक अकाउंटचा तो उपयोग करायचा . हे करताना त्या बँक अकाऊंटचे ए टी एम कार्ड तो स्वतः वापरायचा आणि अकाऊन्टमधून पैसे काढायचा.


वृत्तपत्रांमध्ये द्यायचा जाहिरात 


अनुप मनोरेला फसवणुकीच्या या प्रकारची कल्पना त्याचा मित्र असलेल्या एका कथेतून सुचली असं त्यानं तपास करणाऱ्या पोलिसांना सांगितलंय. पण या कथेमध्ये अनुप पुढं स्वतःची भर घालत गेला. फसवणुकीचं हे जाळं  विणताना त्यानं अनेक महिलांना त्याच्या सोबत घेतलं . त्यासाठी तो वृत्तपत्रांमध्ये "महिलांसाठी नोकरीची संधी" अशा शीर्षकाखाली जाहिरात द्यायचा. ती जाहिरात बघून ज्या महिला त्याच्याशी संपर्क करायच्या त्या महिलांकडून तो त्यांची कागदपत्रं मागवून घ्यायचा आणि त्यांचा योपयोग करून बँकेमध्ये अकाऊंट ओपन करायचा. प्रत्येक अकाऊंटच्या बदल्यात  त्या महिलांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये द्यायचा आणि बाकी पैसे स्वतः वापरायचा. ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरले जातायत ते एका महिलेच्या नावावर असल्याने पैसे भरणाऱ्या पुरुषाला आपण फसवले जातोय याचा संशय यायचा नाही. मागील दहा वर्षात कळत-नकळतपणे अनेक महिला आणि पुरुष अशाप्रकारे  त्याच्या या कथेतील पात्र बनत गेल्या.  


कथालेखनाचा हा प्रकार भयानक 


कथालेखनाचे अनेक प्रकार मराठी साहित्यात प्रचलित आहेत. पण अनुप मनोरेने निवडलेला हा नवा प्रकार कोणी कल्पनाही करणार नाही असा आहे.अनुप मनोरे हा साधासुधा लेखक नाही तर प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्या आधारे लेखन करणारा लेखक आहे .या लेखनातूनच त्यानं ही अशी रंगीबेरंगी मायावी दुनिया उभारली. या दुनियेत प्रवेश हवा असेल तर या कथेतील पात्रांना लाखो रुपये मोजावे लागत होते. गेल्या दहा वर्षांपासून तो ही कथा लिहीत होता जी आता त्याच्या अटकेपर्यंत पोहोचलीय . पण आता यातूनही आणखी एक कथा तयार होऊ शकेल असं तो पोलिसांना म्हणतोय. खरं तर प्रत्यक्ष अनुभव घेऊन जे लिखाण केलं जातं ते अधिक कसदार, अधिक सकस मानलं जातं. पण त्यासाठी प्रत्यक्ष गुन्हे करण्याचा अनुभव घेतला जात असले तर कथालेखनाचा हा प्रकार भयानक म्हणावा लागेल.


फसवणुकीच्या कथेत अनेक महिलाही पुढे सहभागी


अनुप मनोरेच्या या फसवणुकीच्या कथेत अनेक महिलाही पुढे सहभागी होत गेल्या. त्यापैकी दीपाली शिंदे नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केलीय तर आणखी दोन महिलांचा शोध पोलीस घेतायत. पुण्यातील एका 76 वर्षांच्या व्यवसायिकानेदीपाली शिंदेने आपल्याला  हाय प्रोफाइल महिलांशी संबंध निर्माण करून देतो असं सांगत  वेगवगेळ्या बँक अकाउंटमध्ये साठ लाख रुपये जमा करायला लावल्याची तक्रार सायबर पोलिसांना दिली. टेक्निकल अॅनॅलिसीस करून पोलिस दीपाली शिंदेपर्यंत पोहचले. मात्र तिने फसवणुकीच्या या  रॅकेटचा मास्टरमाइंड आपण नसून गणेश शेलार असल्याचं सांगितलं. पोलीस या गणेश शेलार पर्यंत पोहचले. मात्र गणेश शेलार हाच अनुप मनोरे असल्याचं पुढं उघड झालं. 


हे सगळं लेखनातच सुचलं आणि या सर्वांची आणखी एक कथा होईल


पोलीस निरीक्षक संगीता माळी सांगतात कि पुण्यातील एका 76 वर्षांच्या एका व्यवसायिकाचा मनोरेने विणलेल्या या मायावी दुनियेवर इतका विश्वास बसला होता की त्याने मागील वर्षभरात तब्ब्ल साठ लाख रुपये मनोरेने सांगितलेल्या बँक अकाउंटवर जमा केले . या व्यवसायिकाच्या घरच्यांना संशय आल्याने त्यांनी माहिती काढली असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला . त्यानंतर घरच्यांच्या दबावापोटी हा व्यवसायिक पोलिसांकडे तक्रार द्यायला तयार झाला. त्याने आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर आम्ही या प्रकरणाचा तपास सुरु केला. पुढे आम्ही दीपाली शिंदेला अटक केली. सुरुवातीला हे रॅकेट दीपाली शिंदेच चालवत असावी असं आम्हाला वाटलं. पण तिने गणेश शेलार हा या रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं .  टेक्निकल अॅनॅलिसीस केल्यावर आम्ही गणेश शेलारपर्यंत पोहोचलो. पुढे गणेश शेलार हाच अनुप मनोरे असल्याचं उघड झालं.अनुप मनोरेला अटक केल्यानंतर देखील तो अतिशय थंडपणे पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं देत होता मी लेखक आहे आणि माझी पत्नी देखील लेखिका आहे. आपल्याला हे सगळं लेखनातच सुचलं आणि या सर्वांची आणखी एक कथा होईल असं तो पोलिसांना म्हणत आहे. 


अनुप मनोरेचं हे गुन्हेगारी कथालेखन गेल्या दहा वर्षांपासून सुरु


पोलीस निरीक्षक संगीता माळी सांगतात की, अनुप मनोरे हा चौकशी दरम्यान  हे सगळं आपल्याला लेखनातून सुचलं असं म्हणतो आणि या सगळ्यातून एक कथा तयार होईल असंही तो  सांगतो. लिखाणातूनच त्याला स्फूर्ती मिळते असं त्याच म्हणणं आहे. अनुप मनोरेकडून अनेक महिलांच्या नावे उघडण्यात आलेल्या बँक अकाउंटचा उपयोग मागील दहा वर्षात पुरुषांना फसवण्यासाठी करण्यात आला.  फसवल्या गेलेल्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवगेळ्या शहरांमधील पुरुषांचा समावेश आहे. त्याच्या कॉल रेकॉर्ड आणि बँक ट्रान्सक्शन्समधून या सगळ्यांची नावं पोलिसांना मिळाली आहेत. अशाप्रकारे  फसवल्या गेलेल्या पुरुषांची संख्या प्रचंड मोठी आहे. पण बदनामीच्या भीतीने आतापर्यंत तक्रार देण्यासाठी कोणी पुढं येत नव्हतं. त्यामुळं अनुप मनोरेचं हे गुन्हेगारी कथालेखन गेल्या दहा वर्षांपासून सुरु होतं. पण आता या कथेचा शेवट जवळ आला आहे. फसवणुकीच्या या कथेतील पात्रांची संख्या मोठीय. पोलिसांच्या तपासातून त्यांची नावं समोर आली आहेत. या सर्वांची कथा आपण लिहीत असल्याचं अनुप मनोरे म्हणत आला आहे. मात्र मागील दहा वर्षांपासून त्याच्या स्वतःची जी कथा सुरु आहे