Nitish Kumar : बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपच्या विरोधात काँग्रेसइतर पक्षांची मोट बांधण्याचा विचार सध्या सुरू असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. यामागे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सर्व पक्ष मिळून भाजपविरोधी तगडा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे, जेणेकरुन काँग्रेसचाही याला पाठिंबा मिळेल अशी रणनीती सुरू असल्याची चर्चा आहे.


दरम्यान,  मागच्या काही दिवसापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि प्रशांत किशोर यांची हैदराबादमध्ये भेट झाली होती. तेव्हापासून नितीश कुमार यांना राष्ट्रपती बनवण्याची चर्चा सुरू झाली आहे. तेलंगणा निवडणुकीत प्रशांत किशोर यांची टीमने केसीआर यांच्या टीआरएस पक्षासाठी काम करणार आहे. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत नितीश यांना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्यानंतर नितीश आणि प्रशांत किशोर पाटण्यात डिनरसाठी भेटले होते.


राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास नितीशकुमार तयार आहेत का?


राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासंदर्भात नितीश कुमार यांची भूमिका काय? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष आणि भाजपचे युतीचे सरकार आहे. मात्र, जात जनगणनेवरून जेडीयू आणि भाजपमध्ये वाद सुरूच आहे. या मुद्द्यावर आरजेडी नितीश यांच्यासोबत आहे. तेजस्वी यादव आणि के चंद्रशेखर राव यांच्यातही बैठक झाली आहे. या बैठकीतही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे समजते. गेल्या आठवड्यात चंद्रशेखर राव यांनी मुंबईत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.


तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न


सध्या भाजपविरोधी देशात तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहेत. केसीआर आणि शरद पवार यांच्या भेटीत देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. भाजप आणि काँग्रेसच्या विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे.  पण ही रणनीती राष्ट्रपतीपदच्या निवडणुकीबाबत आहे. यापुढे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील यामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. आणखी काही प्रादेशिक पक्षांना यामध्ये सामील कुरन घेण्याचे काम सुरू आहे. एकंदरीत भाजपच्या विरोधात एवढा तगडा उमेदवार द्यायच की, काँग्रेसलाही त्या उमेदवाराला पाठिंबा देणं भाग पडेल अशी रणनीती आखली जात असल्याची चर्चा सुरू आहे.


महत्त्वाच्या बातम्या: