Pune Crime News Update : हिजवडी आयटी हबमध्ये खळबळ माजवलेल्या अभियंता महिलेची (IT Engineer) हत्या अतिशय निर्घृणपणे केल्याचं समोर आलं आहे. प्रेयसी दुसऱ्याच्या प्रेमात (Love) पडली असावी, या शंकेची सुई प्रियकराच्या मनात इतक्या खोलवर गेली होती की त्याने प्रेयसीच्या डोक्यात आणि शरीरात अशा पाच गोळ्या झाडल्या. शवविच्छेदन अहवालात हे निष्पन्न झालंय, या दोघांमध्ये कोणतेही शारीरिक संबंध नव्हते हे सुद्धा यातून स्पष्ट झालंय. पण तिची हत्या करायचीच या हेतूने तो बंदूक घेऊन, लखनौवरून थेट पुण्याच्या (Pune News) हिंजवडीत आला होता. वंदना द्विवेदी आणि ऋषभ निगम या दोघांच्या प्रेम कहाणीचा असा दी एंड झाला. 


महाविद्यालयीन जीवनात वंदना आणि ऋषभ प्रेमाच्या आकांतात बुडाले होते. पुढं वंदनाने अभियांत्रिकीचं उच्च शिक्षण घेतलं आणि तिने आयटी क्षेत्रात झेप घेतली. अलीकडेच ती पुण्याच्या हिंजवडीतील नामांकित कंपनीत रुजू झाली होती. कंपनीपासून जवळचं एका पीजी हॉस्टेलमध्ये राहायला होती. ऋषभ मात्र लखनौमध्येचं ब्रोकर म्हणून कार्यरत होता. दोघे एकमेकांच्या संपर्कात असायचे, पण ऋषभला अपेक्षित संवाद होत नव्हता. वंदनाच्या आयुष्यात माझी जागा कोणी तरी घेतली आहे? म्हणूनच ती माझ्याशी बोलणं टाळत आहे. वाढलेल्या कम्युनिकेशन गॅपमधून ऋषभने हा निष्कर्ष काढला होता. गेली चार वर्षे त्यांच्यात हे वाद सुरूच होते. तेव्हापासूनचं ऋषभ नेहमी संशयाच्या नजरेतून वंदनाशी बोलायचा. 


ती माझी नाही झाली तर मग कोणाचीच नाही - 


मात्र आयटी कंपनीतील कामाचा ताण आणि त्यातून येणारा थकवा यामुळं वंदना घरी आली की झोपून जायची. हे ऋषभला पटत नव्हतं. ऋषभला अपेक्षित गोष्टी घडत नव्हत्या, सलग चार वर्षे तेच-तेच घडत होतं. त्यामुळं हळूहळू संशयाची सुई मनात खोलवर जात होती. शेवटी ऋषभने 'ती माझी नाही झाली तर मग कोणाचीच होणार नाही.' असा निश्चय केला होता. चार-पाच वर्षांपूर्वीच एका मित्राकडून त्याने बंदूक ही घेऊन ठेवली होती. अखेर 25 जानेवारीला तो लखनौ वरून पुण्यात आला. हिंजवडीतील ओयो टाऊन हाऊस लॉजमध्ये रुम बुक केली. वंदना मात्र 26 जानेवारीच्या सायंकाळी लॉजवर भेटायला आली. परंतु ती मुक्कामी काही थांबली नाही. दुसऱ्या दिवशी ऋषभने वंदनाला पुन्हा बोलावून घेतलं, ते खरेदीसाठी बाहेर जाऊन आले, सोबत जेवणही केलं. दोन दिवस ते अनेक तास सोबत तर होते, पण त्यांच्यात कोणते ही शारीरिक संबंध आलेले नव्हते. 



नवी मुंबई पोलिसांमुळे ऋषभचं बिंग फुटलं -


ऋषभच्या मनात काय चाललंय, याची पुसटशी कल्पना वंदनाला नव्हती. स्वप्नांत ही ज्याचा विचार केला नसेल असं कृत्य ऋषभने 27 जानेवारीच्या रात्री केलं. साडे नऊच्या सुमारास त्याने सोबत आणलेली बंदूक बाहेर काढली अन् वंदनाला काही कळायच्या आत गोळ्या झाडल्या. डोक्यासह शरीरात पाच गोळ्या घालून तिची निर्घृण हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात ती लॉजच्या 306 नंबर खोलीत पडली होती. ऋषभच्या मनातला राग त्याने हत्येच्या रुपात व्यक्त केला आणि काही घडलंच नाही असं दाखवत, तो रात्री दहाच्या सुमारास रुमचा दरवाजा बंद करून पसार झाला. मुंबईच्या दिशेने निघालेला ऋषभ नवी मुंबईच्या नाकेबंदीत पोलिसांना आढळला. त्याच्या शारीरिक हालचाली पाहता, पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याचं साहित्य तपासलं असता बॅगेत बंदूक आढळली आणि ऋषभचं बिंग फुटलं. मग त्याने वरचा सगळा घटनाक्रम बोलून दाखवला. नवी मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांना याबाबत कळवलं. तेव्हा 28 जानेवारीच्या सकाळी वंदनाचा मृतदेह लॉजच्या रुम मध्ये आढळला. हिंजवडीत आयटी अभियंता महिलेची अशी निर्घृण हत्या झाल्याची बातमी समोर आली आणि आयटी क्षेत्रात एकच खळबळ उडाली. हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात ऋषभला देण्यात आलं असून आज त्याला न्यायालयात हजर केलं जाईल.


आणखी वाचा :


OYO मध्ये IT इंजिनियर प्रेयसीवर गोळ्या झाडल्या, 10 वर्षाचं नातं संशयाने संपवलं, उत्तर प्रदेश ते पुणे थरार