Pune Crime : पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. मुंबई पूर्व उपनगरातील मुलुंड (Mulund) इथलं बनावट कॉल सेंटर (Call Center) पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे. या कॉल सेंटरमधून फेक कॉलद्वारे लोकांना लुटलं जात होतं. या कारवाईत चाळीस मोबाईल फोन, सात हार्ड डिस्क आणि इतर साहित्य दत्तवाडी पोलिसांनी जप्त केलं आहे. या कॉल सेंटरमध्ये 43 जण काम करत होते.
कशी करायचे फसवणूक?
"नमस्ते, मी बजाज फिंसर्व्ह लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून सेल्स एक्झिक्युटिव्ह बोलत आहे" असे कॉल करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचं काम या कॉल सेंटरमधून सुरु होतं. यातील आरोपी हे महाराष्ट्रातील विविध शहरातील नागरिकांना फोन कॉलद्वारे बजाज इन्श्युरन्स कंपनीतून बोलत असल्याचं सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करायचे. बजाज फिंसर्व्हची पन्नास लाख रुपयांची पॉलिसी काढल्यानंतर झीरो टक्के व्याजदराने पन्नास लाख रुपयांचे लोन मंजूर करुन देतो असं सांगायचे. नागरिकांकडून त्यांचे आधारकार्ड, कॅन्सल चेक, फोटो यो गोष्टी व्हॉटसअॅपवरुन घेऊन लोनचे सहा महिन्यांचे प्रीमियम 2,50,000 रुपये होत असल्याचे सांगायचे. त्यापैकी 1 लाख 25 रुपये लोन प्रीमियम म्हणून भरण्यास भाग पाडायचे आणि नागरिकांची आर्थिक फसवणूक करायचे.
तक्रार आल्यानंतर पुणे पोलिसांची कारवाई
पुण्यातील एका व्यक्तीची बिनव्याजी लोनच्या नावाने म्हणून अडीच लाख रुपयांची फसवणूक झाली होती. पुणे पोलिसांकडे याची तक्रार येताच त्यांनी या कॉल सेंटरचा शोध घेतला. हे कॉल सेंटर मुंबईतील मुलुंड भागात सुरु असल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर दत्तवाडी पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकून कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. 43 कर्मचाऱ्यांच्या मार्फत हे कॉल सेंटर चालवलं जात होतं.
फसवणुकीसाठी कर्मचाऱ्यांना स्क्रिप्ट
"कॉल सेंटरवर धाड टाकली तेव्हा तिथे 43 मुले आणि मुली फसवणुकीचं काम करत होते. त्यांना ग्राहकांसोबत बोलण्यासाठी एक स्क्रिप्ट दिली जात होती. बोलण्यात ती व्यक्ती गुंतली की कर्मचारी फसवणूक करण्यासाठी तयार केलेली लिंक ग्राहकाला पाठवत होते. त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात होती," अशी माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिली.
या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 419, 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.