Ashish Shelar on MVA : सध्या राज्यात महापुरुषांबाबतच्या वक्तव्यांवरून वाद सुरु आहे. यावरून एकीकडे शनिवारी मविआकडून (Mahavikar Aghadi) महामोर्चा (Mahamorcha) पुकारण्यात आला असताना आता, दुसरीकडे भाजपनेही (BJP) 'माफी मांगो' आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई (Mumbai) भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांना आंबेडकरांची दोन पुस्तकं भेट दिली आहे, राऊतांनी ती वाचावी आणि इतिहास समजून घ्यावा, असं शेलार यांनी म्हटलं.


'राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत'


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असा उल्लेख गुरुवारी संजय राऊत यांनी केला होता. या वक्तव्यावरून शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत, असं म्हणत शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं ते तरी उद्धवजींच्या सेनेला मान्य आहे का असा सवालही शेलारांनी उपस्थित केला. शेलार यांनी पुढे म्हटलं की, संजय राऊत सामनात सर्व काही उद्धवजींमुळेच मिळालं. एवढं होऊनही त्यांनी साधी माफी मागायची तसदी घेतली नाही. ज्या बाबासाहेबांना काँग्रेसने पाडलं त्याचं काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे गेले.


'उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार?'


याशिवाय शेलार यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यावरही हल्ला चढवला. शेलार यांनी पुढे म्हटलं की, काल परवा उद्धवजींच्या सेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचीही वक्तव्य समोर येत आहेत. त्यात हिंदु देवदेवता आणि संताची चेष्ठा तसेच अपमान केला जात आहेत. हा महाराष्ट्राचा द्रोह नाही का? उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार असाही प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.


उद्या भाजपकडून मविआविरोधात माफी मांगो आंदोलन


महामानवाविषयी केलेली वादग्रस्त वक्तव्य उद्धव ठाकरे कसे मान्य करू शकतात, असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. शेलार यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीकडून वारंवार महापुरूषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात येत आहेत. या विरोधात भाजप मुंबईभर माफी मांगो निदर्शनं करणार आहे. जागोजागी 'उद्धवजी माफी मागा, नानापटोले माफी मागा, अजित वार माफी मागा' हे आंदोलन करण्यात येणार आहे. काळे झेंडे दाखवत महाविकास आघाडीचा निषेध करण्यात येणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं.


17 डिसेंबरला मविआचा महामोर्चा


छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा पुकारण्यात आला आहे. राज्यपालांनी छत्रपती  शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनीही महापुरुषांचा अपमान करणारी वक्तव्य केल्यामुळे मविआ आक्रमक झाली आहे. मविआकडून रिचर्डसन क्रूडास मिल ते टाइम्स ऑफ इंडियापर्यंतच मोर्चा काढण्यात येणार आहे.