Rajabhau More : ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे (Rajabhau More) यांचे दृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि आझाद हिंद मंडळाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ मोरे यांनी राज्य नाट्य स्पर्धेत नाटक पाहत असतानाच अखेरचा श्वास घेतला आहे. 


राज्य नाट्य स्पर्धेत नाटक सुरू असताना राजाभाऊंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना झेनिथ रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजाभाऊंनी आपले संपूर्ण आयुष्य नाट्य क्षेत्रासाठी आणि सामाजिक कार्यात वाहून घेतले होते. 


राजाभाऊ मोरे यांनी राज्य नाट्य स्पर्धेक अनेक नाटकं सादर केली आहेत. तसेच त्यांच्या नाटकांना राज्यस्तरावर पारितोषिते प्राप्त झाली आहेत. नाट्यक्षेत्रासह आध्यात्मिक क्षेत्रातदेखील राजाभाऊंचे मोठे योगदान आहे. नीलकंटेशवर देवस्थानचे ते विश्वस्त होते. तसेच आझाद हिंद मंडळाच्या सार्वजनिक हनुमान मंदिर आणि हनुमान जन्मोत्सव अनेक वर्षापासून साजरा करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. 






नाट्यक्षेत्रासाठी आणि मंडळासाठी राजाभाऊंनी कृषी विभागातून सेवा निवृत्ती घेतली होती. त्यांच्या निधनाने आझाद हिंद मंडळ (Azad Hind Mandal) आणि मोरे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अमरावतीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. राजाभाऊंच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 


राजाभाऊ मोरे यांना नाट्यपरिषदेच्या वतीने 'जीवनगौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य फक्त नाटकासाठीच वेचलं आहे. अमरावती आणि आसपासच्या ग्रामीण भागात नाटक पोहोचवण्यात राजाभाऊ मोरे यांचा मोठा वाटा आहे. त्यावेळी त्यांनी प्रभाकर पणशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती नाट्य परिषदेची स्थापना केली होती. 


राजाभाऊंच्या निधनानंतर सांस्कृतिक आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे,"अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मींचा आधारवड हरपल्याचे दु:ख आहे. रंगदेवतेचा वास असलेल्या नाट्यगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी दिग्दर्शक, नेपथ्यकार म्हणून दीर्घकाळ हौशी व प्रायोगिक रंगभूमीची सेवा केली".  


संबंधित बातम्या


Parag Bedekar : मनोरंजनसृष्टीवर शोककळा; 'आभाळमाया' मालिकेतील अभिनेत्याचं निधन