Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने (Murder) वाढ होत आहे. त्यातच आता नात्याला काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे. सतत आजारी पडत असल्याने मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 28 वर्षीय मुलाची वारंवार आजारी पडल्यामुळे गळा दाबून हत्या केली. पुण्यातील हडपसर परिसरात ही घटना घडली (Pune crime news) आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
बाबूराव दिनकर जायभाय (50) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेची आई सुनीता यांनी फिर्याद दिल्यानंतर हडपसर पोलिसांनी पोटच्या पोराचीच हत्या करणाऱ्या पित्याला तात्काळ अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेक अभिजित बाबुराव जायभाई हा वारंवार आजारी असायचा आणि तो काहीही काम करत नव्हता. तो आणि त्याचे आई-वडील तुकायदर्शन येथे भाडेतत्त्वावर राहत होते. उपचारासाठी पैसे मिळत नसल्याने आरोपीनी गुरुवारी (दि. 13) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरी झोपलेल्या मुलाची गळा घोटून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
मरण स्वस्त झालंय का?
पुण्यात सध्या गुन्हेगारीत चांगलीच वाढ झाली आहे. शुल्लक कारणावरुन हत्या आणि हल्ले केले जात आहेत. यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. समाजातील क्रूरता वाढत आहे. त्यामुळेच अशा घटना समोर येत आहे. या घटनांमुळे द्वेशाचं वातावरण निर्माण होत असल्याचं वारंवार घडत असलेल्या घटनांवरुन समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या लेकीची आईनेच गळा दाबून हत्या केली होती. 2 मार्चला खडकी पोलिसांना तीन वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केल्याचं शवविच्छेदनातून समोर आलं होतं. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि अखेर पोलिसांना या चिमुकलीच्या हत्येचा उलगडा करण्यात यश आलं. या चिमुरडीची हत्या आई आणि तिच्या प्रियकराने गळा आवळून केल्याचं पोलीस तापासात समोर आलं होतं.
पोलिसांसमोर मोठं आव्हान...
पुण्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. रोज पुण्यात नवे गुन्हे समोर येत आहेत. चोरी, खून, महिलांवरील अत्याचार, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. शिवाय कोयता गँग, चुहा गँगचीही दहशत पाहायला मिळते. अशातच आता हडपसरमधून ही हादरवणारी घटना समोर आली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर उभं राहिलं आहे. ही गुन्हेगारी कधी थांबणार किंवा या गुन्हेगारीला आळा कधी बसणार, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :