Mumbai Police Threat Call : 7 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कंट्रोल रुममध्ये कॉल करुन मुंबईत तीन दहशतवादी (Terrorists) घुसल्याची चुकीची आणि खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) अटक केली आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संबंधित आरोपीला बेड्या ठोकण्यात आला. यासिन सय्यद असं आरोपीचं नाव असल्याचं कळतं. त्याचं वय 47 वर्षे आहे.
दुबईहून शुक्रवारी सकाळी तीन दहशतवादी मुंबईत आले आहेत, त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे, असं यासिन सय्यद याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये फोन करुन सांगितलं होतं. यावेळी त्याने एका दहशतवाद्याचं नाव मुजीब सय्यद असल्याचं सांगितलं होतं. तसंच त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर पोलिसांना दिला होता.
वैयक्तिक वैमनस्यातून कॉल करुन खोटी माहिती
या कॉलनंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. महाराष्ट्र एटीएसने देखील तपास केला. वैयक्तिक वैमनस्यातून अशाप्रकारे फोन करुन खोटी माहिती दिल्याचे तपासात उघड झालं.आरोपीने 2013 साली हे सिमकार्ड विकत घेतले होते आणि ते कार्ड बंद होऊ नये म्हणून ते फक्त रिचार्ज करत होता. बदला घेण्यासाठी मुंबई पोलिसांना फोन करताना त्याने या सिम कार्डचा वापर केला होता.
यानंतर महाराष्ट्र एटीएसने आरोपीला अहमदनगरमधील अटक करुन मुंबईत आणलं आणि पुढील कारवाईसाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला येणाऱ्या फोन कॉलची तपासणी पोलिसांकडून करण्यात येते. दरम्यान शुक्रवारी (7 एप्रिल) मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करुन मुंबईत तीन दहशतवादी आल्याची माहिती दिली. तसेच हे तीनही व्यक्ती दुबई इथून आले असून, त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे फोन करणाऱ्या व्यक्तीने एक दहशतवाद्याचं नाव आणि नंबर देखील दिला आहे. सोबतच एका गाडीचे नंबर देखील दिला.
मुंबई पोलीस आणि एटीएसकडून तपास
दरम्यान पोलिसांनी संबंधित फोन कॉल गांभीर्याने घेत, संबंधित व्यक्ती, मोबाईल नंबर आणि गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यासाठी पोलिसांची काही पथके नियुक्त केली होती. सोबतच महाराष्ट्र एटीएस देखील या फोन कॉलचा तपास करत होती. तपासादरम्यान कॉल करणारी व्यक्ती अहमदनगरमधील असल्याचं समोर आलं. यानंतर एटीएसने अहमदनगरमध्ये जात यासिन सय्यद नावाच्या व्यक्तीला फोन करुन खोटी माहिती दिल्या प्रकरण बेड्या ठोकल्या.
पोलीस नियंत्रण कक्षात सातत्याने फेक कॉल
मात्र गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना सतत असे फोन येत असून, पुढे तपासात फोन करणारे व्यक्ती मनोरुग्ण किंवा एखाद्या व्यक्तीशी बदला घेण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या फोनबाबत देखील असेच काही असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
संबंधित बातमी
Mumbai Threat Call : मुंबईत तीन अतिरेकी, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन; पोलीस यंत्रणा अलर्ट