Pune Crime News: इंदापूर तालुक्यातील (Inapur) गावात सहावीत शिकणाऱ्या 13 वर्षीय भोळसर आणि अपंग मुलीवर वारंवार लैंगिक (rape) अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. अत्याचार झाल्यानंतर ती मुलगी गरोदर झाल्याचं समोर आलं असून या प्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका महिलेचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 


अनिल नलावडे,  नाना बगाडे आणि शुभांगी कुचेकर या प्रकरणातील आरोपींची नावे आहे. अनिल नलावडे याने वारंवार या मुलीवर बलात्कार केल्याची फिर्याद या मुलीच्या आईने दिल्यानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत वारंवार पीडितेवर बलात्कार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. 


शुभांगी कुचेकर ही महिला या प्रकरणातील पीडितेला आरोपींकडे सोपवायची. मागील आठवड्यात या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला बारामतीत तपासणीसाठी नेल्यानंतर ही मुलगी गरोदर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुलीने सर्व प्रकार सांगितला आणि मुलीच्या आईने वालचंदनगर पोलिसांकडे धाव घेतली.


बलात्कारासाठी महिलेनंच केली मदत
बलात्कारासाठी शुंभागी कुचेकर आणि नाना बागडे यांनी सहकार्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही महिला मुलीला फिरायला नेते असं सांगून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला मदत करत होती. महिलेनेच असं कृत्य केल्याने तिच्यावर सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे.


अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
इंदापूर तालुक्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार सातत्याने वाढत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. महिलेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रशासनाचं लक्ष कुठे आहे, नराधमांना शिक्षा होत नाही त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्यानं नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न अशा घटनांमुळे ऐरणीवर आला आहे. 


लैंगिक अत्याचाराचं सत्र संपेनाच
16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील एका गावात घडली आहे. पीडितेला बळजबरीने मक्याच्या शेतात ओढून नेत नराधमांनी तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेसंदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वालचंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी राहुल हनुमंत जाधव या मुख्य आरोपीस वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर दोघे अद्याप फरार आहेत.