नागपूर: नोकरी लावून देण्याच्या नावावर एका महिलेची 14 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी पीडित शीतल सतीश पाटील (34) रा. हिरानगर, नारा रोडच्या तक्रारीवरून तीन आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे. धर्मेंद्र हेमराज फुले (45), अरुणा धर्मेंद्र फुले (40) दोन्ही रा. सिडको कॉलनी, बुटीबोरी आणि कविता प्रीतम नगराळे (39) रा. पाचपावली अशी आरोपींची नावे आहेत.


सरकारी कार्यालयात ओळख असल्याची बतावणी


शीतलचे पती सतीश खासगी संस्थेत कामाला आहेत. ती स्वत:ही शिक्षित आहे आणि नोकरीच्या शोधात होती. कविताशी शीतलची जुनी ओळख होती. जुलै 2017 मध्ये कविताने शीतलची फुले दाम्पत्याशी भेट करून दिली. यावेळी आरोपी दाम्पत्याने सरकारी कार्यालयात त्यांची ओळख असल्याचे शीतलला सांगितले. तसेच तिची इच्छा असेल तर भंडारा येथील शहापूर जिल्हा परिषद कार्यालयात ते तिला लिपिक पदावर नोकरी लावून देऊ शकतात. मात्र त्यासाठी पैसे लागतील. शीतलने आपल्या पतीला याबाबत सांगितले. सरकारी नोकरी असल्याने ते पैसे देण्यास तयार झाले. त्यांनी वेळो-वेळी फुले दाम्पत्याला रोख आणि धनादेशाद्वारे 14 लाख रुपये दिले. 


Nagpur Crime : छेड काढणाऱ्यामुळे किरायाचे घर सोडले, माथेफिरूने केले मुलीच्या वडिलांना केले ठार


फसवणूक झाल्याचे समजले


काही दिवसातच नियुक्ती पत्र मिळण्याचे आरोपींनी आश्वासन दिले. मात्र अनेक दिवस लोटूनही शीतलला नोकरी मिळाली नाही. शीतलने याबाबत आरोपींकडे विचारणा केली असता ते टाळाटाळ करू लागले. शीतलला त्यांच्यावर संशय आला. तिने त्यांच्याबाबत चौकशी केली असता फुले दाम्पत्य ‘फ्रॉड’ आहे. काम करून देण्याच्या नावावर ते लोकांकडून पैसे लुबाडत असल्याचे समजले. शीतलने आरोपींना आपले पैसे परत मागितले असता त्यांनी देण्यास नकार दिला. अखेर त्रस्त होऊन शीतलने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हेगारी षडयंत्र आणि फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


Nagpur Crime Diary : मैत्रिणींना घरी बोलावून दोघांकडूनही अत्याचार, फेसबुक फ्रेन्डने केला घात