नागपूर: दिवसा सर्वसामान्य व्यक्ति प्रमाणे समाजात वावरायचं, नियमित आपले टेलरिंगच्या दुकानात इमाने इतबारे कपडे शिवायचे. मात्र रात्र होताच असे काही कृत्य करायचं की, ज्या कारवाईने गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांना (Nagpur Police) देखील घाम फोडला होता. ही गोष्ट आहे केवळ आठवीपर्यत शिक्षण घेतलेल्या एका सराईत गुन्हेगाराची. या सराईत चोरट्याने केवळ एका महिन्यात तब्बल 12 पेक्षा अधिक घरांची कुलपे तोडून लाखोंचा माल लंपास केला. अमोल राऊत असे या 34 वर्षीय आरोपीचे नाव असून गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाला या चोरट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले आहे. या चोराकडून आता पर्यन्त दागिने आणि रोख असे 35 लाख रुपयांसह 44.61 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून त्याने 12 हून अधिक गुन्हे केल्याचे कबूल केले असून त्याच्या चौकशी दरम्यान आणखी काही गुन्हे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


दिवसा टेलरिंगचा व्यवसाय तर रात्री करायचा घरफोडी


आरोपी अमोल राऊत हा बुटीबोरी येथील बोरकुटे ले-आऊट मधील रहिवासी असून त्याच्या घरीच टेलरिंगचा व्यवसाय आहे. तो दिवसा टेलरिंगचा व्यवसाय करायच आणि संध्याकाळी बाईकवर प्रवास करून घरांची रेकी करायाचा. दिवाळीच्या कालावधीत बाहेरगावी गेलेल्या लोकांची घरे हेरून तो रात्री एकटाच चोरी करायचा. अमोल कपडे शिवण्यात जसा तरबेज आहे, त्याचप्रमाणे तो घरफोड्यातही सराईत आहे. कुलूप आणि दाराची टिचकनी/कडी तोडण्यात त्याने महारत मिळवली होती. शिवाय केवळ आठवी शेकलेला अमोल डोक्याने देखील चपळ असल्याने त्याने पोलिसांना हैराण करून सोडले होते. पोलिसांना पुरावा मिळू नये म्हणून तो घरफोडीनंतर घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरी करीत होता. त्यानंतर तो ते डीव्हीआर एखाद्या नाल्यात फेकत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा पुरावा मिळत नव्हता. अमोलला चार वर्षाचा एक मुलगा असून त्याची पत्नी बुटीक चालविते. गेल्या काही काळात घरफोडी आणि चोरीच्या घटनेत सातत्याने होणारी वाढ ही पोलिसांसाठी मोठी चिंतेची बाब ठरली होती. मात्र अखेर या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश आले. घरफोडीच्या अनेक घटनेत अमोलचा सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. आतापर्यंत चौकशीदरम्यान त्याने 12 हून अधिक घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.


 


केवळ एका महिन्यात तब्बल 12 पेक्षा अधिक घरफोडी


दिवाळीच्या 21 दिवसांत नागपूर शहरात जवळ जवळ 50 हून अधिक  घरफोड्यांची नोंद झाली आहे.यामुळे पोलीस यंत्रणेत देखील खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणात वरिष्ठांनी फटकारल्यानंतर पोलिस यंत्रणा अॅक्शन  मोडवर आली होती. गेल्या काही दिवसात नागपुरातील दुपारे ले आऊट,सोनेगाव,भेंडे ले आऊट, प्रतापनगर इत्यादी भागात रात्रीची गस्त वाढवून परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी पोलीस करत होते. एकंदरीत या पाहणी दरम्यान त्यात एक संशयास्पद व्यक्ती रात्री फिरतांना दिसून आली. एके दिवशी असाच एक ठिकाणी चोर चोरी करत असताना लोकांची नजर या चोरावर गेली. चोराने पकडले जाण्याच्या भीतीने एकच पळ ठोकला. या चोराच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला जेरबंद केले. तपासा दरम्यान पकडण्यात आलेला आरोपी अमोल असून त्यांच्या घराची झडती घेतली असता लाखोंच्या घरात रोकड आणि मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. 


सराईत चोरटा असलेल्या अमोलने दिवाळीच्या अवघ्या काही दिवसात एकापाठोपाठ एक अशा 12 घरफोड्या केल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून तो घरफोड्या करतो. सतत घरफोडीच्या घटना घडत असल्याने पोलिसही देखील त्रस्त झाले होते. अशातच पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकानेही तपास सुरू केला होता. अखेर त्यांच्या कारवाईला यश आले आहे. या आरोपीच्या चौकशीत अमोलने आतापर्यंत 12 गुन्ह्यांचा खुलासा केला आहे. तर चोरट्याकडून आतापर्यंत दागिने व रोख असे 35 लाख रुपयांसह 44.61 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच पुढील चौकशी दरम्यान आणखी काही गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.