मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता (code of conduct) लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत या 10 दिवसांत एकूण 90 कोटी 74 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी, गेल्या 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, आज पुण्यात (Pune) सोन्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचीही पोलिसांनी तपासणी केली होती. तर, दोन दिवसांपूर्वी खेड-शिवापूर येथे एका कारमधून 5 कोटींपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर, आज जळगाव आणि बीडमध्येही रोकड जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 19 अमलबजावणी यत्रणांनी एका दिवसात 52 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त करण्याची कामगिरी बजावली आहे. विविध ठिकाणी वापरलेले पोलिस विभाग आणि इतर यंत्रणाची तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.
1) इन्कमटॅक्स डिपार्टमेन्ट 30,93,92,573/-
2) रेव्हयून्यू इन्टेलिजन्स 8,30,84,878/-
3) राज्य पोलीस डिपार्टमेंट 8,10,12,811/-
4) नाकॉटिस्ट कंन्ट्रोल ब्यूरो- 2,50,00,000/-
5)राज्य उत्पादन शुल्क विभाग 1,75,00,392/- ५)
6) कस्टम डिपार्टमेट 72,65,745/
दिवसभरात झालेल्या कारवाईमध्ये नागपूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी ह्या जिल्ह्यांमधल्या मोठ्या कारवायांचा समावेश आहे. ह्यातून निवडणूक यंत्रणा टक्ष असून मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश गेला आहे. प्रत्येक प्रकरणाचे मागील धागेदोरे तपास काढून गुन्ह्याची साखळी मोडून काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत, सर्व मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सीव्हिजील अॅपवर तक्रार करता येते. ह्या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.
24 तास कक्ष सुरू
धनशक्तीचा वापर करुन मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभाग देखील पुढे सरसावला आहे. राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात धनशक्तीचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने प्राप्तीकर विभागाने मुंबई इथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सुरु असेल या नियंत्रण कक्षाकडे नागरिक 1800221510 हा टोल फ्री क्रमांक 8976176276 आणि 8976176776 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा mumbai addidit.inv7@incometax.gov.in या ईमेलवर आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर प्राप्तीकर विभागाद्वारे जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.
सी-व्हिजिल अॅपवर आचारसंहिता भंगच्या 1144 तक्रारी
15 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) अॅपवर एकूण 1144 तकारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 1142 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण 99 टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) अॅप हे कोणत्याही अॅपस्टोअरमधून करता येते. या अॅपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.