Maharashtra Vidhan Sabha Election 2024 नागपूर : महायुतीच चांगली होती, असं बोलण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) आलीय. भाजप (BJP) सोबतची महायुती तोडून आपण काय साध्य केलं, हे मी काय करून चुकलो, असं डोक्यावर हात मारून विचार करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघात (Ramtek Assembly Constituency) काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचच्या पार्श्वभूमीवर रामटेक मधील महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करत जोरदार टोला लगावला आहे.


काँग्रेस उद्धव ठाकरेंना एक एक जागेसाठी रडवत आहे


उद्धव ठाकरे यांना पूर्व विदर्भात 32 जागांपैकी एक जागा ती रामटेकची दिली आणि त्यावरही आता काँग्रेसची नजर आहे. म्हणजे काँग्रेस उद्धव ठाकरेंना एकही जागा देणार नाही का? काँग्रेस उद्धवजींचा फायदा तर घेत आहे, आता काँग्रेसचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांसाठी किती काम करतील हेही पाहायचं आहे. काँग्रेस उद्धव ठाकरे यांना हैराण आणि परेशान करण्यासाठी डाव रचत आहे. काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना एक एक जागेसाठी रडवत आहे. 


एक काळ होता जेव्हा फक्त चार जागांसाठी भाजप सोबत युती तुटली होती. आज तेच उद्धव ठाकरे 85 जागांवर समाधानी आहे आणि एक एक जागेसाठी त्यांना रडवले जात आहे. अशा स्थितीत महायुती चांगली होती, अशा बोलण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली असल्याची टीका आशिष जयस्वाल यांनी केली आहे. त्यामुळे भाजप सोबतची महायुती तोडून काय साध्य केलं आपण, हा आज खरा प्रश्न आहे आणि हा नक्कीच उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात येत असावा. असेही ते म्हणाले. 


उद्धव ठाकरेंचे जे हाल होत आहे ते मला बघवत नाही


उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सत्तेमध्ये घेऊन पुन्हा जिवंत केले. तीच काँग्रेस आणि त्यांचे कार्यकर्ते निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारासोबत किती प्रमाणात राहतात, हे येणाऱ्या काही दिवसात दिसेल. त्यामुळे हे मी काय करून चुकलो आहे, हे डोक्यावर हात मारून विचार करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर येईल. यांचे जे हाल होत आहे ते मला बघवत नाही. असेही आशिष जयस्वाल म्हणाले.