Palghar Crime News :  एका दहा वर्षीय शालेय विद्यार्थीनीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीच्या घरच्यांसोबत असलेल्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. आरोपी हा मुलीच्या घराशेजारीच राहतो. ही घटना पालघर जिल्ह्यातील (Palghar) तलासरी तालुक्यात (Talasari) घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे. 


पोलिसांनी या प्रकरणी रमेश दुबळा (वय 45) या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी रमेश दुबळा याचे मुलीच्या घरच्यांसोबत वाद होते. या वादाच्या रागातून हे कृत्य केले. दुर्देवी मृत मुलगी बुधवारी शाळेत जात असताना आरोपीने तिला आपल्या मोटरसायकलवर बसवले आणि शाळेत नेत असल्याचे सांगितले. रात्र, झाल्यानंतरही आपली मुलगी घरी आली नसल्याने धास्तावलेल्या आई-वडिलांनी तलासरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलगी हरवली असल्याती तक्रार नोंदवली. 


या तक्रारीनंतर पोलिसांनी लागलीच आपली तपास चक्र फिरवली. त्यानंतर एका परिसराचे सीसीटीव्ही फूटेज मिळवले. या सीसीटीव्ही फूटेजमधून मुलीला मोटर सायकलवरून नेत असलेला एक व्यक्ती दिसला. चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती मुलीच्या घराशेजारीच राहणारी असल्याचे पोलिसांना समजले. मुलीच्या नातेवाईकांनीदेखील तिची ओळख पटवली. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे व त्यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार केली. मुलीच्या शोधासाठी तातडीने शोध मोहीम राबवली. 


शोध मोहीम राबवत असताना रात्री एक ते दीडच्या सुमारास दुबळा ह्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दुबळा याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी दुबळा याने घरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळा परिसरात मुलीला नेले. या परिसरातील निर्जन स्थळी तिच्यावर अत्याचार केला आणि तिची हत्या केली असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीने माहिती दिल्यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. तिचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: