मुंबई: घरबसल्या आमच्या यूट्यूब व्हिडीओला लाईक करा आणि पैसे कमवा असा व्हॉट्सअॅपवर तुम्हाला मेसेज आलाय का? असा मेसेज आला असेल तर त्याला कोणताही रिप्लाय देऊ नका, त्या नंबरला ब्लॉक करणे योग्य ठरेल. अन्यथा तुम्हालाही लाखो रुपयांचा गंडा बसू शकतो. हा मेसेज म्हणजे ऑनलाईन फ्रॉडचा भाग असून यामध्ये तुम्हाला घरबसल्या लाखो रुपये कमवण्याची संधी असल्याचा भास निर्माण केला जातो, तुम्हाला आर्थिक मोहात पाडून फसवणूक केली जाऊ शकते. असे मेसेज करणाऱ्यांना पकडणं पोलिसांनाही अवघड होऊन बसलं आहे, कारण हे ठग जगातल्या कोणत्यातरी कोपऱ्यात बसून हे उद्योग करत असतात. 


स्कॅमर यूजर्सना कसे आकर्षित करतात?


हा घोटाळा करण्यासाठी सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम सारख्या एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करतात. ते युजर्सना एका अज्ञात नंबरवरून मेसेज टाकतात, त्यांना YouTube वर काही व्हिडीओ लाईक करण्यास सांगितलं जातं. त्यानंर प्रत्येक लाईकमागे 50 रुपये देण्याचं आश्वासन दिलं जातं.


हे व्हिडीओ सामान्यतः जागतिक ब्रँड जसे की Gucci, Chanel आणि तशा मोठ्या कंपन्यांच्या व्यावसायिक जाहिराती असतात. वापरकर्त्यांना ते व्हिडीओ लाईक करण्यास आणि व्हॉट्सअॅपवर त्याचे स्क्रीनशॉट शेअर करण्यास सांगितले जाते.


आता यूजर्सने एकदा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर, त्यांना त्वरित सांगितलेली रक्कम दिली जाते.जर तुम्ही एक व्हिडीओ 'लाईक' केला तर तुम्हाला 50 रुपये मिळतील. जर तुम्हाला तीन व्हिडिओ 'लाइक' केले तर तुम्हाला 150 रुपये मिळतील आणि असंच पुढं सुरू राहतं.


यूजर्सनी आवडलेल्या YouTube व्हिडीओंचे स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर, त्यांना टेलिग्राम डाउनलोड करण्यास सांगितले जाते आणि त्यांची रक्कम घेण्यासाठी रिसेप्शनिस्टशी बोलण्यास सांगितले जाते.


काही प्रकरणांमध्ये, वापरकर्ते टेलीग्राम गटांमध्ये जोडले जातात ज्यात आधीपासूनच अनेक सदस्य आहेत. येथे यूजर्सना जास्त उत्पन्न देण्याचे आश्वासन देऊन विशिष्ट रक्कम भरण्यास सांगितली जाते. ही रक्कम जर त्याने भरली तर ती बुडाल्यात जमा आहे, कारण हे ठग ती रक्कम परत कधीच देत नाहीत. 


टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नोएडामध्ये राहणारी एक 42 वर्षीय महिला यामध्ये फसली आणि तिला 13 लाखांचा भूर्दंड बसला. अधिक परतावा देण्याचं आमिष तिला दाखवलं आणि तिला गंडा घातला. 


त्यामुळे जर तुम्हाला परदेशी कोड असलेल्या अनोळखी क्रमांकांवरून असे मेसेज मिळत असतील, तर तो नंबर लगेच ब्लॉक करणे योग्य आहे आणि शक्य असल्यास, तुमच्या स्थानिक पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटशी संपर्क साधा.


या बातम्या वाचा: