Pune-Mumbai Express highway : मागील काही दिवसांपासून मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे. या अपघातात अनेकजण दगावले देखील आहे. लोणावळा घाटात गेल्या 15 दिवसात दोन भीषण अपघात झाल्याने शासकीय यंत्रणा खाडकन जागी झाली आहे. या अपघातात 13 जणांचे बळी गेले तर 12 गाड्यांचा चक्काचूर झाला होता. हे पाहता आज MSRDC, RTO, महामार्ग पोलीस , स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी दौरा केला. यात या मार्गावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.
लोणावळा घाटातील तीव्र उतार, अवघड वळण यांची पाहणी केली. यात एकूण घाटातील 5 अपघाती ब्लॅक स्पॅाट निश्चित करून त्या ठिकाणी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. लोणावळा वरून येणारी जड वाहणे अंड्डा पॅाईंट वरून खोपोलीत उतरू नये यासाठी हाईट बॅरेकट्स लावली आहेत. जेणे करून घाटातील जुन्या हायवेला ही वाहणे न जाता थेट मुख्य एक्सप्रेसवे वरून खाली उतरतील. त्याच बरोबर सिग्नल वाढविण्यात येणार आहेत. महामार्ग पोलीसांकडून जड वाहनांवर विशेष लक्ष देत त्यांना घाटाच्या आधीच थांबवून पाहणी करण्यात येणार आहे.
या मार्गावर अपघात रोखण्यासाठी खासदार बारणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी झालेला अपघात हा चुकीच्या बाजूने गाडी आल्याने झाला होता. त्यामुळे या संदर्भातदेखील वाहतूक पोलिसांना सूचना दिल्या आहे.
दिशादर्शक लावण्याच्या सूचना
या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते त्यात ही वाहनं मोठ्या प्रमाणात लेन कटींग करत असतात परिणामी इतर गाड्यांना वाहनांच्या लेन कटींगमुळे अंदाज घेणं शक्य होत नाही. त्यामुळे यानंतर लेन कटींग करणाऱ्या अवजड वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यासोबतच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दिशादर्शक फलक नाही आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना रस्ता समजण्यास समस्या निर्माण होत होती. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे सुरुवातीला दिशादर्शक फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या आठ दिवसांत या मार्गावर फलक लावण्यात येणार असल्याची माहिती बारणे यांनी दिली आहे.
LED लाईट्स लावण्याचं नियोजन
या मार्गावर अनेक ठिकाणी कठडे नाही आहेत. त्यामुळे अपघात होतात. रात्रीच्यावेळी ज्या ठिकाणी कठडे आहेत. त्याठिकाणी लाईट किंवा दिशादर्शन नाहीत. टनलमधील लाईट काही प्रमाणात बंद आहेत. त्यामुळे ते लाईट्स दुरुस्त करण्याच्या सुचना दिल्या आहेत शिवाय काही ठिकाणी LED लाईट्सदेखील लावण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले.