ठाणे : अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तिघांना अंमली  विरोधी पथकाने डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली आहे. त्यांच्याकडून अंमली विरोधी पथकाने तब्बल 1 किलो 894 ग्रॅम चरस आणि 308 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 43 लाख 43 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


अंमली  विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार डायघर येथील देसाई नाका परिसरात काही व्यक्ती कारमधून चरस व गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने मंगळवारी सायंकाळी डायघर परिसरातील देसाई नाका परिसरात सापळा लावला. पथक सावज हेरीत असताना एका संशयित कारमधून तिघांना पोलिसांनी येताना पहिले. दरम्यान आरोपींना काही समजण्याच्या पूर्वीच पथकाने शिताफीने तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्या नंतर कारमध्ये लपवून ठेवण्यात आलेले अंमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले. 


कारमध्ये पोलिसांना तब्बल 1 किलो 894 ग्रॅम चरस आणि 308 ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी चरस व गांजा, टाटा टियागो कार, मोबाईल आणि रोकड असा एकूण 43 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत तीन तस्करांना अटक केली. या प्रकरणी अंमली विरोधी पथकाने एरिकक किल्लेन (27), रा. - डोंबिवली, सुमेध कसबे (24),रा.  नवी मुंबई आणि प्रवीण चौधरी (27), रा.  डोंबिवली यांच्या विरोधात डायघर पोलीस ठाण्यात अंमली  पदार्थ विरोधी कायदा नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस पथक आरोपींची अधिक चौकशी करीत असून हा अंमली  पदार्थाचा साठा कोठून आणला आणि कुणाला देण्यासाठी आणल्याची चौकशी करीत आहेत.